सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून राजकीय घटनांना वेग आला आहे. एकीकडे प्रचार कामाला वेग आलेला असताना दुसरीकडे, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन हे सध्या तुरुंगात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवडणूक प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर यायचे आहे. त्यासाठी सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीनासाठी दाद मागितली होती. मात्र, हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीला उशीर केल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याचा फायदा झाला नसून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अंतरिम सुटकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याप्रकरणी सोमवारी होणाऱ्या जामीन याचिकेसोबत हे प्रकरणही घेण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
दरम्यान, हेमंत सोरेन यांनी आपल्या याचिकेत अंतरिम जामीन अर्जावर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हेमंत सोरेन म्हणाले होते की, उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता, परंतु अद्याप निर्णय दिला नाही. मात्र, यावर सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १३ मे रोजी सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा:
“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”
‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’
११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप
‘गरज पडल्यास इस्रायल एकट्याने लढेल’
हेमंत सोरेन यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेचे समर्थन करत याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ईडीकडे पुरेसे पुरावे आहेत आणि हेमंत सोरेन यांची अटक चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही.