भारताचा मराठमोळा आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यासह केदार जाधव याने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर काही काळ त्याने क्रिकेट समालोचकाची भूमिका बजावली होती. आता त्याने थेट राजकारणाच्या आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे. केदार जाधव याने मंगळवार, ८ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केदारने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे.
पक्ष प्रवेशावेळी केदार जाधव म्हणाला की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत देशाचा खूप विकास केला आहे. नरेंद्र मोदींनी जसा देशाचा विकास केला तसाच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास केला. आता आपण विकसित भारताच्या दिशेने जात आहोत. आतापर्यंतच्या कित्येक सरकारांना जमलं नाही ते केंद्रात नरेंद्र मोदी यांनी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे.”
हे ही वाचा..
भावाला अडकवण्यासाठी थेट मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!
बांगलादेशाची अफगाणिस्तानच्या दिशेने वाटचाल? KFC, Pizza Hut, Bata वर जबर हल्ले
केदार जाधव याने गेल्या वर्षाच्या जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली होती. केदार जाधवने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. पहिला एकदिवसीय सामना त्याने रांचीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याने ७३ एकदिवसीय सामन्यांत ४२.०९ च्या सरासरीने एकूण १३८९ धावा केल्या. केदार जाधवने एकदीवसीय सामन्यांत दोन शतकं तसेच सहा अर्धशतकं केलेली आहेत. केदार जाधवच्या नावावर २७ बळी आहेत.