मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने आज फेटाळला आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज विशेष पीएमएलएने तीन मुद्यांवरून नाकारला आहे. ते म्हणजे ईडीकडे अनिल देशमुखांविरोधात भक्कम पुरावे आहेत. त्या पुराव्यांवरून अनिल देशमुखांनी मनी लाँड्रिंग केल्याचे स्पष्ट दिसत आहे.तर सेक्शन ४५ नुसार साक्षीदारांच्या जबाबात तफावत असल्यामुळे या क्षणी कोर्ट ते तपासू शकत नाही.
सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने २९ डिसेंबर २०२१ रोजी माजी मंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यामुळे तेव्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
हे ही वाचा:
फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही
मविआ सरकारचे धोरण म्हणजे, ‘दुसऱ्याला लेकरं झाली तर प्रोत्साहन आम्हीच दिलं
दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी
नेमके काय आहे प्रकरण ?
परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली आहे.