लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होत आहेत. अशातच आता कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला जोरदार दणका बसला आहे. डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यानंतर आता कल्याण ग्रामीणमधील माजी उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
शिवसेना ठाकरे गटातील ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे ग्रामीण भागात सक्रिय होते. त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा फायदा शिवसेनेला लोकसभेत होणार आहे.
आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही आणि भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी बोलून दाखविली. तसेच यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुकही केले. त्यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली आहे, असं ते म्हणाले. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना दिलासा; निर्यातीवरील बंदी हटवली
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे डोंबिवलीतील तीर्थक्षेत्र असून ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम हे म्हात्रे यांच्या कार्यकाळात राबविले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकट वर्तीय म्हणून म्हात्रे यांच्याकडे पाहीले जात होते. अखेर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. शिव सैनिकांना ठाकरे गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.