उद्धव ठाकरे यांचा पुन्हा भावनिक खेळ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल प्रदर्शित झाल्यावर दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. या भागातही उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार आणि भाजपा यांच्यावर निशाणा साधला.
सत्ताधाऱ्यांना विरोधकांची भीती वाटत असेल तर तो त्यांचा कमकुवत पण आहे. सत्ता ही येत असते जात असते. ‘अग्नीवीर योजने’मधून वीर डोक्यात अग्नी घेऊन बाहेर पडणार आहेत. सैन्य कंत्राटी पद्धतीने असणार आहे मग सगळच कंत्राटी पद्धतीने करा. राज्यकर्ते पण कंत्राटी करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
केंद्रीय तपासयंत्रणेविषयी न्यायालयानेसुद्धा मत नोंदवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आधी अटक करतात मग आरोप लावतात. तोपर्यंत एखाद्याचं आयुष्य बरबाद होतं. पण अशी लोक सुखाने राहू शकत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केंद्रीय यंत्रणांवर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जो आपल्या कर्माने मारणार आहे त्याला धर्माने मारू नका. सत्तेत असताना भाजपा नेते म्हणत होते की हे २४ तासात तुरुंगात जातील. पण आता त्यांचीच तोंडं बंद आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
भाजपाने त्यांचे विरोधक शत्रू न वाढवता आरोग्यदायक राजकारण करावं. २०१४ मध्ये भाजपाने अचानक युती तोडली. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यामागे कारण होतं. बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिल होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार. मी मुख्यमंत्री बनणार हे बोललो नव्हतो. त्यामुळे आजही हे स्वप्न अपूर्णच आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होणार. ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्यांच्या पुत्राला गादीवरून उतरवलं , अशी टाका उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर केली आहे. त्यांना केवळ लालसा, चटक आहे. उद्या हे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करतील, पंतप्रधान पद मागतील त्यामुळे भाजपाही फार वेळ त्यांना सोबत ठेवणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ऑपरेशन काळात आणि त्यानंतर फार कोणाला भेटलो नाही कारण जागेवरून हलता येत नव्हतं. पण ते आमच्या कुटुंबाचे सदस्यच होते. निधी वाटपाबाबत अजित पवारांनी स्पष्ट केलं आहेच की कोणत्या खात्याला किती निधी दिला. प्रकृती सुधारल्यानंतर बैठका सुरू केल्या होत्या. योग्य सूचना देत होतो, मार्गदर्शन करत होतो. पण जर जायचंच होतं तर समोर येऊन का बोलला नाहीत. पाप होतं म्हणून डोळ्यात घालून बोलले नाहीत, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असे का वागले काय कळलंच नाही. पण तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. भाजपाला शिवासैनिकाकडून शिवसेना संपवायची आहे. पण मी त्यांना आपलं मानत होतो तरीही ते गेले. आपले नव्हते ते गेल्यावर वाईट वाटायचं कारण नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर ‘वर्षा’ वरून ‘मातोश्री’वर जात असताना लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. एखादा मुख्यमंत्री पदावरून जात असताना लोक गलबलतात हे कुठे घडत नाही आणि त्यावेळी घडलं ही माझी कमाई आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबातला मी वाटतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मला असं भासवलं जात होतं की काँग्रेस तुम्हाला दगा देणार. काही लोक बोलत होते की शरद पवार धोका देणार पण इथेतर आपल्याच माणसांनी दगा दिला. मी इच्छेने मुख्यमंत्री झालो नाही तर जिद्दीने झालो. माझी इच्छा नव्हती.
सध्याचं सरकार म्हणजे हम दो कमरेमे बंद हो असं सरकार आहे. याचं पुढे न्यायालयात जो निर्णय होईल ते मान्य असेल. पण आधी घेतलेल्या निर्णयाला जी स्थगिती दिली जात आहे त्यासाठी सुद्धा घाई केली जातेय. माझा राग मुंबईवर काढू नका. कांजूरच्या जमिनीवर यांना जावंच लागणार आहे. स्वतःच्या हट्टापाई मुंबईचा घात करत आहेत. त्यांना मुंबईवरून शिवसेनेचा ठसा पुसायचा आहे. रावणाचा जीव बेंबीत तसं यांचा जीव मुंबईत आहे. पण मुंबईवर मराठी माणसाचा भगवा पुन्हा फडकणार. मुंबईकर आता निवडणूकीची वाट बघतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. आदित्य ठाकरे दौरे करत आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसादसुद्धा आहे. आता ऑगस्टमध्ये मी महाराष्ट्र दौरा करणार. जनतेच्या अश्रूंची किंमत मोजायला लावणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.