नागपूर येथील उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार यांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टमध्ये १ कोटी ५९ लाख ५२ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी शेख हुसेन यांच्यासह माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
शेख हुसेन हे १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ट्रस्टचे अध्यक्ष होते. पदावर असताना दोघांनी ऑडिट न करता पाच वर्षांत १ कोटी ५९ हजार रुपयांचा अपहार केला. या दोघांचा कालावधी संपल्यानंतर ताज अहमद अली अहमद सय्यद यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी ऑडिट करवून घेतले असता त्यात दीड कोटी रुपयांची हेरफेर असल्याची माहिती समोर आली होती.
त्यानंतर सप्टेंबर २०२२ ला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा समोर आला. सय्यद यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी शेख हुसेन आणि माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे, शेख हुसेन व वेलजी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला होता.
हे ही वाचा:
सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात
लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी
राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी
‘द केरळ स्टोरी’बद्दल चांगलं लिहिलं म्हणून तरुणाला केली मारहाण
त्यानंतर त्यांनी सर्वोच्य न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तोही फेटाळल्यानंतर त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ते न्यायालयात सादर होताच, त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत सत्र न्यायालयातून बुधवारपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.