माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कडवट शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

रायगड जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर ते शिक्षणासाठी मुंबईला आले. पुढे त्यांचा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंध आला. महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती.

१९७६ ला मुंबईचे महापौर, त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष अशी अनेक मोठी पदे त्यांनी भूषविली होती.

हे ही वाचा:

कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते

नाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू

शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारीवाला माणसा’चे चिन्ह

त्यांचे मुख्यमंत्री पद विशेष चर्चेत राहिले होते. मुख्यमंत्री असताना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले होते. तेव्हा त्यांनी तात्काळ बाळासाहेबांचा आदेश मानत मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जाण्याने एक कडवट शिवसैनिक गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. शुक्रवारी दुपारी नंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Exit mobile version