बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगाने निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगाने निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी सायंकाळी वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. ते कर्करोगाने ग्रस्त असल्याने आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते २०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांनी एप्रिलमध्ये स्पष्ट केले होते.

राज्यसभेचे माजी खासदार असणाऱ्या मोदी यांचे पार्थिव मंगळवार, १४ मे रोजी पाटणा येथील राजेंद्र नगर भागातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला तसेच, सुशील कुमार मोदी यांच्या कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त केली.

‘पक्षातील माझे बहुमोल सहकारी आणि माझे अनेक दशकांचे मित्र, सुशील मोदीजी यांच्या अकाली निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. बिहारमध्ये भाजपच्या उदय आणि यशात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर भावना व्यक्त केल्या.

‘ते अतिशय कष्टाळू आणि मनमिळावू आमदार म्हणून ओळखले जात होते. राजकारणाशी संबंधित प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची सक्रिय भूमिका कायम स्मरणात राहील. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि समर्थकांसोबत आहेत,’ अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदीजी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. बिहार भाजपचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. ओम शांती शांती,’ अशी प्रतिक्रिया सम्राट चौधरी यांनी पोस्ट केले.

‘सुशील मोदीजी आता आपल्यात नाहीत. हे संपूर्ण भाजप कुटुंबाचे तसेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांचे संघटनात्मक कौशल्य, प्रशासकीय समज आणि सामाजिक राजकीय विषयावरील त्यांचे सखोल ज्ञान यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. दिवंगत आत्म्याला चिरशांती देवो आणि या दु:खाच्या प्रसंगी कुटुंबीयांना बळ देवो,’ अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिन्हा यांनी दिली.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील ‘एक्स’वर शोक व्यक्त केला. ‘बिहारचे माजी उपमुख्यमंत्री, आमचे पालक, संघर्षशील आणि कष्टाळू नेते आदरणीय श्री सुशील यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला खूप दुःख झाले. देव दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो आणि या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना शक्ती देवो,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

कोण होते सुशील कुमार मोदी?

५ जानेवारी १९५२ रोजी जन्मलेले सुशील कुमार मोदी यांनी पाटणा विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली, जिथे त्यांनी १९७३मध्ये विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून काम केले. आपल्या तीन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत, सुशील मोदी यांनी नगरसेवक, आमदार आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य यांसह विविध पदे भूषवली. सन २००५ ते २०१३ आणि पुन्हा २०१७ ते २०२०पर्यंत त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. मोदी हे १९९०मध्ये पाटणा मध्य मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९६ ते २००४ या काळात त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.

हे ही वाचा:

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी!

‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’

‘पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांनी तिकडं जा, भीक मागून खा’

‘देशात एनडीए ४०० जागा जिंकण्याच्या मार्गावर!’

सन २००४मध्ये सुशील मोदींनी भागलपूरमधून लोकसभेची जागा जिंकून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. तथापि, सन २००५मध्ये, त्यांनी विधान परिषदेत सामील होण्यासाठी आणि बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची भूमिका स्वीकारण्यासाठी ते खासदारपदावरून पायउतार झाले.

Exit mobile version