26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणख्वाजा मेरे ख्वाजा...बीएमसी दिला जा

ख्वाजा मेरे ख्वाजा…बीएमसी दिला जा

Google News Follow

Related

ज्वलंत हिंदुत्वाचा बाता फेकणार्‍या शिवसेनेकडून हल्ली वारंवार मुस्लीम तुष्टीकरणाचे प्रयत्न दिसून येतात. बहुतेकवेळी याचे मुख्य केंद्र हे मुंबई आणि उपनगरात असते. याचे ताजे उदाहरण म्हणजे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे होत असलेल्या उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची केलेली मागणी. या मागणीला धरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की ‘छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा.’

धक्कादायक बाब म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेना हा पक्ष स्थापन झाला, त्या छत्रपतींचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीने डिसेंबर, २०२० मध्येच केली आहे. भाजपा खासदार मनोज कोटक यांनी १९ डिसेंबर रोजी त्या संबंधीचे पत्र मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समितीच्या अध्यक्षांकडे पाठवले आहे. आता यावर शिवसेनेकडून स्थानिकांच्या मागणीचे कारण देण्यात येऊ शकते.

पण जर स्थानिक नागरिकांच्या मागणीची शिवसेनेला एवढीच चिंता असेल तर नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या विमानतळाचे उदाहरण काही दिवसांपूर्वीचेच आहे. या परिसरातील स्थानिकांनी विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती. मग या मागणीचा विचार शिवसेनेला का करावासा वाटला नाही? हा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचे नामकरण सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना रेटते याचे मुख्य कारण स्थानिकांची मागणी यापेक्षाही आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मतपेढीचे राजकारण हे आहे.

शिवसेना या राजकीय पक्षाचा प्राण हा ‘बीएमसी’ नावाच्या पोपटात आहे ही गोष्ट जगजाहीर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या दृष्टीने कंबर कसली आहे. त्यात शिवसेना ही आलीच. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आपल्या पारंपारिक मतदारावर अवलंबून न राहता अपारंपरिक मतदाराला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत यात प्रामुख्याने मुस्लिम मतदारांचा समावेश आहे.

मुंबईतील मुस्लिम मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर ही टक्केवारी अंदाजे १८ ते १९ टक्के असल्याचे समजते. त्यामुळे मुस्लिम मतदाराला खूष करण्यासाठी शिवसेनेने शक्य ते सर्व प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मग कधी शिवसेना नेते पांडुरंग सपकाळ हे अझान स्पर्धेच आयोजन करताना दिसतात. तर वडाळ्यातील युवा सेना उर्दू कॅलेंडर काढून त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ असा करताना दिसते.

एकीकडे पक्षीय पातळीवरून हे सारे खटाटोप सुरू असतानाच शासकीय पातळीवरूनही मुस्लिम मतदाराला जवळ करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू दिसतात. या वर्षी मार्च महिन्यात मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांकडून भायखळा येथे उर्दू भवन बांधावे अशी मागणी करण्यात आली आहे. २०१७ चा मुंबई महापालिकेच्या निवडणूक जाहीरनाम्यात शिवसेनेने ‘डब्बावाला भवन’ बांधण्याचे वचन दिले होते. सत्ता येऊन चार वर्ष झाली तरी शिवसेनेला या आपल्या वचनाचा विसर पडला होता. पण मुंबई महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्यानंतर शिवसेना अचानक खडबडून जागी झाली आणि त्यांनी ‘डब्बावाला भवन’ बांधण्यासाठी निधी मंजूर केला. पण या सोबतच उर्दू भवनही बांधण्यात यावे आणि त्यासाठी तब्बल १.५ कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी शिवसेना नगरसेवकांकडून होताना दिसते.

हे ही वाचा:

…आणि बघता बघता पार्किंगमधली कार बुडाली

शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध

गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली!

पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?

राज्य सरकारच्या माध्यमातूनही हे प्रयत्त्न शिवसेनेकडून होताना दिसतात. भावी शिवसेना पक्षप्रमुख (ही घराणेशाही नसून ‘लोकभावना’ आहे याची नोंद वाचकांनी घ्यावी) आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात असलेल्या हाजी अली दर्ग्याच्या विकासासाठी ठाकरे सरकारकडून ३५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या नावावर सण-समारंभांवर निर्बंध घालतानाही ठाकरे सरकारकडून कायमच दाढ्या कुरवाळण्याचा प्रकार केला जातो. होळी साजरी करण्यावर बंदी घालण्याचा फतवा काढला जातो, पण शब-ए-बारातला मात्र परवानगी दिली जाते. या सगळ्या कारभारातून शिवसेनेचे ‘हिरवीकरण’ झाल्याची बाब लपून राहत नाहीच.

पण याची सुरुवात अत्ता झाली अशातला भाग नाही. याची सुरुवात आधीच झाली होती. या आधीही मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुस्लिम मतांवर शिवसेनेने डोळा ठेवला होता. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीच्यावेळीही शिवसेनेने उर्दू वर्तमानपत्रात उर्दू भाषेतून दिलेली जाहिरात चांगलीच गाजली होती. या जाहिरातीतूनही शिवसेनेने मुस्लिम मतदारांना उद्देशून बांग दिली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘केम छो वरळी’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंनी उर्दूतून हिरव्या रंगाची बॅनरबाजीही केली होती. बॅनरवर जरी त्यांनी ‘सलाम वरळी’ लिहिले असले तरी त्या मागची भावना ही ‘अस्सलाम वालेकुम वरळी’ हीच असण्याची शक्यता अधिक आहे.

यात विचार करण्यासारखी बाब ही आहे की एवढी वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या आणि मुंबईच्या विकासाचे दावे करणाऱ्या शिवसेनेला नवे मतदार शोधण्याची वेळ का आली आहे? मुंबई मॉडेलच्या नावावर शिवसेना आपली कितीही पाठ थोपटून घेत असली तरीही या मॉडेलचा फोलपणा वेळोवेळी उघड झाला आहे. कोविडच्या काळात मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार जनतेला खूपच त्रासदायक ठरला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात लोकांचा रोष असणे स्वाभाविक आहे. तसेच इतके वर्ष महापालिकेत सत्ताधारी असल्यामुळे नैसर्गिकरित्या येणारी मतदारांची नाराजी (अँटी इन्कंबंसी) ही देखील चिंतेची बाब असणार आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत नवे समीकरण केले. हे समीकरण टिकवून ठेवणे ही शिवसेनेची गरज आहे. त्यासाठी त्यांनी हिंदुत्व खुंटीला टांगून ठेवले आहे. त्यामुळे शिवसेना पदोपदी आपण किती सेक्युलर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. पण इतके वर्षांची निर्माण झालेली मुस्लिम विरोधी प्रतिमा पुसून टाकणे शिवसेनेला सोपे नाही. पण शिवसेना ती प्रतिमा पुसून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे आणि त्याचे कौतुक झालेच पाहिजे.

आगामी काळात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात ‘सामना’ ची एखादी उर्दू आवृत्ती सुरु झाली किंवा मुख्यमंत्र्यांचे एखादे फेसबुक लाईव्ह हे उर्दूतून झाले तरी त्याचे नवल वाटणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा