नागालँडच्या विधानसभेत प्रथमच गुंजले राष्ट्रगीताचे सूर

नागालँडच्या विधानसभेत प्रथमच गुंजले राष्ट्रगीताचे सूर

नागालँड या राज्याच्या १ डिसेंबर १९६३ स्थापनेनंतर प्रथमच राज्याच्या विधानसभेत राष्ट्रगीत वाजवण्यात आले. नागालँडच्या १३व्या विधानसभेच्या सातव्या अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. इतक्या वर्षात प्रथमच ही सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. नागालँडचे गव्हर्नर आरएन रवी यांच्या अभिभाषणापूर्वी प्रथमच राष्ट्रगीत वाजले असे नागालँड राज्याचे भाजपा अध्यक्ष तेमजेन इम्ना आलोंग यांनी सांगितले. त्याबरोबर त्यांनी हे देखील नमूद केले की यात कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा भाग नाही. राष्ट्रगीताने विधानसभेच्या अधिवेशनाची झालेली सुरूवात सर्वच सदस्यांनी सकारात्मक रित्या स्वीकारली आहे.

हे ही वाचा:

आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले

याबाबत नागालँडच्या विधानसभेचे सचिव आणि आयुक्त डॉ. पी जे ऍंटोनी यांनी सांगितले, की विनाकारणच नागालँडच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या सुरूवातीला राष्ट्रगीत वाजवण्याची परंपरा नव्हती. याबाबत राज्याच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी देखील सांगितले, की त्यांच्या कारकीर्दीतही राष्ट्रगीताने अधिवेशनाची सुरूवात करण्याची परंपरा नव्हती. मात्र जर अशी सुरूवात केली जात असेल तर ते केव्हाही स्वागतार्ह्य आहेच. हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी असे सांगितले होते.

याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक नितीन गोखले यांनी ट्वीट केले आहे. ट्वीटरवर त्यांनी या घटनेचा व्हिडीयो टाकला आहे. ते म्हणतात की हा व्हिडियो नीट बघा सुरूवातीला हे सामान्य वाटेल. परंतु हे नागालँडच्या विधानसभेतील दृश्य आहे हे कळल्यावर तुम्हालाही माझ्यासारखाच धक्का बसेल. नागालँड राज्याची स्थापना १ डिसेंबर १९६३ रोजी झाली होती. याबरोबरच तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच त्रिपुराच्या विधानसभेतही राष्ट्रगीत वाजल्याचे त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version