सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख या सरपंचाच्या हत्येचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. यानिमित्ताने महायुती सरकारची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र हा विषय एकीकडे गंभीर असल्याचे दाखविणाऱ्या महाविकास आघाडीला त्याच विषयातून सनसनाटी निर्माण करता येईल, असेही वाटते.
या सगळ्या मुद्द्यावर नागपूर विधिमंडळाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावरून सरकारवर आरोप केले. त्याचवेळी सोबत संदीप क्षीरसागर आणि भाई जगताप तिथे उपस्थित होते.
आव्हाड पत्रकारांशी संवाद साधत असताना संदीप क्षीरसागर यांनी शेजारी उभ्या असलेल्या भाई जगताप यांना विचारले की, मी या मुद्द्यावर बोलू का? तेव्हा जगताप म्हणाले, विरोधी पक्षनेते बोलत आहेत. तेव्हा संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्या जिल्ह्यातील विषय आहे तेव्हा…त्यावर भाई जगताप म्हणाले, विषय तुमच्या जिल्ह्यातील असला तरी विरोधी पक्ष नेत्याने बोलायचे असते असा शिष्टाचार आहे. त्यावर संदीप क्षीरसागर म्हणाले की, नाही. विषय झणझणीत आहे म्हणून.त्यावर भाई जगताप म्हणाले, असे शंभर विषय आहेत. तरी तू बोल.
हे ही वाचा:
सोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय सरकारचा नाही, अध्यक्षांचा
रातापाणी व्याघ्र प्रकल्पाला पुरातत्वशास्त्रज्ञा डॉ. विष्णू वाकणकरांचे नाव!
हिंदुंवरील हिंसाचार प्रकरणी बांगलादेश सरकारला येतेय जाग!
एकीकडे विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीने हा विषय उचलून धरला असून सरकार यातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पण खुद्द मविआला मात्र हे प्रकरण झणझणीत वाटते आहे, असे व्हीडिओवरून स्पष्ट होते आहे.
संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच होते. त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे त्यांना ठार केले. त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे या विषयावरून संताप व्यक्त होत आहे.