चारा घोटाळ्याशी संबंधित पाचव्या गुन्ह्यात सीबीआयचे विशेष न्यायालय सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव व इतर ३७ आरोपींच्या शिक्षेचा निर्णय देणार आहे. या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दोषी ठरवले होते. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यांना इतर चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी हे आज शिक्षा जाहीर करणार आहेत. या प्रकरणातील न्यायालयातील संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांची रिम्स रुग्णालयात रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे लालूंसाठी रिम्स रुग्णालयातील पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिक्षेची सुनावणी दुपारी १२ वाजता सुरू होणार असून लालू हे रुग्णालयाच्या पेइंग वॉर्डमधून हजर राहतील तर इतर आरोपी होटवार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील. डोरंडा कोषागारातून अवैधरित्या १३९.३५ कोटी रुपये काढले गेले होते. लालूंना जर तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे.
हे ही वाचा:
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
या प्रकरणात न्यायालयाने १५ फेब्रुवारीला ज्या ३५ दोषींना प्रत्येकी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, त्यात पब्लिक अकाऊंट्स कमिटीचे तत्कालीन चेअरमन ध्रुव भगत, माजी खासदार जगदीश शर्मा यांचा समावेश आहे. त्यांना तीनपेक्षा कमी वर्षांची शिक्षा झाल्यामुळे जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. न्यायालयाने त्यांना २० हजार ते २ लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.