केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली घोषणा
तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली.
नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी उपस्थित होते. ही अत्यंत दुखद घटना आहे. या दुर्घटनेत ८७ लोक गेल्याचं कळतं. ४४ मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.
राज्य आणि केंद्र सरकार या ठिकाणी पुन्हा चांगल्याप्रकारे वसाहत बांधतील. मृत पावलेल्यांना परत आणता येणार नाही. पण आहेत त्यांना दिलासा देणार आहे. स्थानिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून प्रांत लेव्हलाच अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
या गावातच आपलं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरती वसाहत तयार करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोक सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्व घटनेची माहिती दिली जाईल. नुकसानीचं स्वरुप सांगितलं जाईल. त्यांनीही मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
ऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला
तालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज
फडणवीस, राणे आणि दरेकरांचा आज कोकण दौरा
महाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा
कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले.