कर्नाटक मधील महत्त्वाच्या अशा मैसूर महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. मैसूर महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपाचा महापौर पालिकेत विराजमान झाला आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सुनंदा पलनेत्रा या ऐतिहासिक मैसूर शहराच्या नव्या महापौर म्हणून निवडल्या गेल्या आहेत.
बुधवार, २५ ऑगस्ट रोजी मैसूर महापालिकेत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार सुनंदा पलनेत्रा विजयी झाल्या आहेत. या आधी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे दोन पक्ष मैसूर महापालिकेच्या सत्तेत एकत्र होते. मैसूर महापालिकेतील महापौर निवडणुकांच्या दृष्टीने या दोन पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. पण त्यांच्यातील बोलणी फिसकटली. यानंतर जनता दल सेक्युलर या निवडणुकीत तटस्थ राहिला. त्यामुळे भाजपाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.
हे ही वाचा:
सरसंघचालकांनी घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, गोवर्धन पिठाच्या शंकराचार्यांशीही भेट
लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत
प्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार
संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा
६५ सदस्यांच्या मैसूर महापालिकेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहेत. भाजपाचे एकूण २३ सदस्य महापालिकेत आहेत. तर काँग्रेसचे १९ आणि जनता दल सेक्युलरचे १७ सदस्य आहेत. त्याबरोबरच पाच अपक्ष आणि एक बसपा सदस्य महापालिकेत प्रतिनिधित्व करतात.
या आधी जनता दल सेक्युलरच्या रुक्मिणी माडेगौडा या मैसूरच्या महापौर होत्या. पण निवडणुक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपांमुळे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्याचा निकाल त्यांच्या विरोधात लागला. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवून त्यांचे प्रतिनिधित्व रद्द झाले. यामुळे मैसूर महापालिकेतील महापौर पद रिक्त झाले.