महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे. अशातच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंसह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विरारमधील विवांता हॉटेलमध्ये घेरल्याचा प्रकार घडला. यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप केला.
विनोद तावडेंवर बविआने पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यानंतर या हॉटेलमध्ये बराच काळ राडा सुरू होता. या प्रकरणी विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद सुरु केली होती. मात्र, ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही असं सांगण्यात आलं. यानंतर मात्र विनोद तावडे हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. बविआकडून आरोप झाल्यावर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून गेले. क्षितिज ठाकूर हे गाडी चालवत होते. तब्बल साडे चार तासानंतर ही नेतेमंडळी हॉटेलच्या बाहेर पडले.
हे ही वाचा :
मूल्य आणि तत्त्वे कमी झाल्यामुळेच ‘आप’ला सोडचिठ्ठी!
मतदानावेळी मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपास करू नये; सपाचे निवडणूक आयोगाला पत्र
आचारसंहितेच्या काळात कारवाई दरम्यान ६६० कोटींची मालमत्ता जप्त
व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे
दरम्यान, यावर विनोद तावडे यांनी म्हटले आहे की, “पोलिसांनी चौकशी करावी. सीसीटीव्हीचीही चौकशी करावी. मी ४० वर्षांपासून राजकारणात आहे. अप्पा ठाकूर ओळखतात, क्षितीज यांनाही माहीत आहे. सर्व पक्ष मला ओळखतात. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. मी इथे आलो आणि समोरच्या मित्र पक्षांचा समज झाला की मी पैसे वाटतो. पैसे वाटप होत असेल तर निवडणूक आयोग चौकशी करेल. निवडणुकीच्या कामाबाबतची माहिती देण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली होती,” असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिले आहे.