पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील दिरंगाईबद्दल पंजाबच्या फिरोजपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एसएसपी हरमन हंस असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
फिरोजपूर येथे नियोजित कार्यक्रमाला जात असताना पंतप्रधानांच्या ताफ्याला शेतकरी आंदोलकांनी अडवले. त्यामुळे २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा उड्डाण पूलावर अडकून पडला आणि नंतर ताफा मागे वळला. या सगळ्या प्रकाराबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना या पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
एकीकडे राज्य पोलिसांची यात कोणतीही चूक नाही, असा दावा पंजाबात सत्तेत असलेल्या काँग्रेसकडून केला जात असताना या एसएसपीला मग का निलंबित केले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे मागितला असून जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पोलिसांनीच सांगितला पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग
वृद्ध महिलेला लुटणारी टोळी २४ तासांत जेरबंद
म्युझिकल हिट ‘दुश्मन ‘ला ५० वर्षे
पंतप्रधान मोदी हे फिरोजपूर येथील कार्यक्रमासाठी बुधवारी जाणार होते. प्रारंभी, हेलिकॉप्टरने त्यांचा प्रवास होणार होता पण हवामानामुळे त्यांना हवाई मार्गाने प्रवास करणे टाळावे लागले. नंतर हा प्रवास रस्तामार्गे करण्याचे ठरले. फिरोजपूरमध्ये ४२ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. पण स्थानिक पोलिस प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पंतप्रधानांचा ताफा भर रस्त्यात अडविला गेला. मोदींचा हा ताफा १५ ते २० मिनिटे अडकल्याचे सांगण्यात आले. त्यावरून देशभरात संतापाचे वातावरण असून काँग्रेसने हे जाणीवपूर्वक केले असा आरोपही होत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीही सुरक्षा व्यवस्थेतील या हलगर्जीपणाबद्दल पंजाबमधील चन्नी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आम आदमी पार्टीनेही या दिरंगाईवर टीका केली आहे.