२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिस प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहे. या संबंधातच आता उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पत्रकार आणि राजकारण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
२६ जानेवारी रोजी दिल्लीत घडलेला हिंसेचा तांडव साऱ्या जगानेच पाहिला. लोकशाही काळीमा फासणाऱ्या या घटनेची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या हिंसाचारात सहभागी असलेल्या आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांच्याच मुसक्या आवळण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. या मोहीमे अंतर्गतच दिल्ली हिंसाचाराच्या वेळी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यां विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. नोएडाच्या सेक्टर २० पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या एफआयआर मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ, १५३-ब, २९५-अ, २९८, ५०४, ५०६ इत्यादी कलमांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या या एफआयआर मध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, इंडिया टुडे वाहिनीचे पत्रकार राजदिप सरदेसाई, नॅशनल हेराल्डच्या संपादकीय सल्लागार मृणाल पाण्डेय, कौमी आवाजचे मुख्य संपादक जफर आगा कोमी, कारवा मासिकाचे मुख्य संपादक परेशनाथ, संपादक अनंतनाथ आणि कार्यकारी संपादक विनोद जोस यांच्या नावांचा समावेश आहे.