जनता दलाचे (संयुक्त) नेते एचडी कुमारस्वामी यांनी घरात दिवाळीची रोषणाई करताना वीजचोरी केल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेसने केला होता. या प्रकरणी आता त्यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या नेत्याने कुमारस्वामी यांनी बेंगळुरूतील त्यांच्या घरात दिवाळीनमित्त रोषणाई करताना वीजचोरी केल्याचा ठपका ठेवला होता. शेजारच्या वीजवाहिनीवरून जोडणी घेऊन ही रोषणाई केल्याचे त्यांनी म्हटले होते. तसा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या या आरोपानंतर कुमारस्वामी यांनी याची कबुली दिली आहे. खासगी डेकोरेटरने त्यांच्या घराची दिवाळीची रोषणाई करताना शेजारच्या वीजवाहिनीवरून जोडणी घेतल्याची कबुली त्यांनी दिली.
‘जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला हा प्रकार निदर्शनास आला. मी तातडीने ही जोडणी काढली आणि घरच्या मीटरबॉक्समधूनच दिव्यांची रोषणाई केली जाईल, याची खातरजमा केली,’ असे कुमारस्वामी यांनी नमूद केले असून त्यांनी या झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर बंगळुरू वीजपुरवठा कंपनीच्या दक्षता पथकाने वीजचोरीबाबत एफआयआर दाखल केला आहे.
हे ही वाचा:
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!
कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
पवार त्यांच्याच सापळ्यात अडकले…
कर्नाटक काँग्रेसने त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी एक केबल दाखवल होती. जी केबल कुमारस्वामी यांच्या जेपी नगर येथील घरातून नेत रस्त्यापलीकडे असलेल्या वीजवाहिनीशी जोडण्यात आली होती.
‘माजी मुख्यमंत्री अशाप्रकारे वीजचोरी करतात, हे खरोखरच चिंताजनक आहे. तुम्हीच ‘कर्नाटक हे अंधाराच्या गर्तेत आहे’ असे विधान पत्रकार परिषद घेऊन केले होते ना? आणि आता तुम्हीत तुमचे घर चोरीची वीज घेऊन उजळत आहात? तुमचे घर अशा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघत असताना तुम्ही कर्नाटक हे काळोखात लोटले गेले आहे, असे कसे म्हणू शकता,? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
या सर्व प्रकारानंतर कुमारस्वामी यांनी वीज प्रशासनाच्या कोणत्याही चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार असून नोटीस प्राप्त झाल्यास आपण दंडही भरू, असे आश्वासन दिले आहे. मात्र काँग्रेसने वीजचोरीसारख्या प्रकरणाची क्षुल्लक घटना म्हणून हेटाळणी करणाऱ्या कुमारस्वामी यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका केली आहे.