लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वात एनडीए सरकार केंद्रात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून काही खासदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. अर्थ मंत्रालय हे निर्मला सीतारमण यांच्याकडेच ठेवण्यात आले. त्यानंतर बुधवार, १२ जून रोजी नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानंतर, पुढील महिन्यात त्या २०२४-२५ साठीचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांची ही दुसरी टर्म आहे. यावेळी त्या जुलैमध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी पाच पूर्ण आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानुसार हा त्यांचा सातवा अर्थसंकल्प असेल. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार आहेत. २४ जून ते ३ जुलै दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प १ जुलै रोजी सादर केला जाऊ शकतो.
Nirmala Sitharaman takes charge as Union Finance Minister@nsitharaman @FinMinIndia pic.twitter.com/3Hvp4okGqv
— DD News (@DDNewslive) June 12, 2024
हे ही वाचा:
अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून
जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध
जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार
मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!
निर्मला सीतारामन या स्वतंत्र भारतातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भारतीय संसदेत पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन या वर्षी जुलैमध्ये अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण यांची राजकीय कारकीर्द २००६ मध्ये सुरू झाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सीतारामन यांचा कनिष्ठ मंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता. सीतारामन यांनी मोदींच्या कार्यकाळात उद्योग आणि वाणिज्य मंत्री आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांना प्रथमच अर्थमंत्री बनवण्यात आले.