तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मंगळवार, १२ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी सभेपूर्वी तलवार दाखवली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवार दाखवल्याप्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की,  नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ एप्रिल रोजी गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे तसेच इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकांची १४७ एकर जमीनीसह आठ मालमत्ता जप्त

दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट

श्रीलंकेपाठोपाठ नेपाळचाही घात; त्यात चीनचा हात

शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध

दरम्यान, कालच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेवर पुन्हा टीका केली होती. तसेच, गेल्या काही दिवसांत राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राज ठाकरेंनी भर सभेत भोंग्यावरून निर्वाणीचा इशारा देत ३ मे पर्यंत जर मशिदींवरचे भोंगे उतरविले नाहीत तर राज्यातील प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली जाईल, असा इशारा दिला आहे.

Exit mobile version