भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली मागणी
‘महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे साक्री डेपोचे वाहक कमलाकर बेंडसे यांना आत्महत्या करावी लागली. ही एसटीच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याची आत्महत्या. आपल्या खात्यातील कर्मचारी आत्महत्या करतात. परिवहन मंत्री अनिल परब यांना झोप तरी कशी येते? असल्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,’ अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर तिखट भाष्य केले आहे.
चित्रा वाघ यांनी बेंडसे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. “बेडसेंच्या मुलाचं पालकत्व शासनाने स्वीकारत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी. तसेच पत्नींला मान्य केल्याप्रमाणे तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे.”, असेही त्या म्हणाल्या. भाजप संपूर्ण कुटूंबाच्या पाठीशी आहे, असेही त्या म्हणाल्या.
बेंडसे यांनी वेतनाअभावी होत असलेल्या हालअपेष्टांना कंटाळून आत्महत्या केली. राज्य परिवहन महामंडळाची अवस्था गेल्या काही वर्षात अत्यंत भीषण झाली असून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचारी आता पत्र लिहून आपली व्यथा मांडू लागले आहेत. एका लहान मुलीने मध्यंतरी व्हीडिओ करून एसटी कर्मचारी असलेल्या आपल्या वडिलांची अवस्था कथन केली होती तर एका कर्मचाऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या कुटुंबाची काय अवस्था आहे त्याचे वर्णन केले होते. यवतमाळमधील एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर सरकारवर टीका केल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले होते. त्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
हे ही वाचा:
शहरातील रस्त्यांवर फेरीवाल्यांचा फेरा!
शाळा फक्त चार तास ठेवा! एक दिवस ऑनलाइन
कल्पिता पिंपळे म्हणतात, हल्ल्यांना घाबरून कारवाई थांबवणार नाही!
करायचे तरी काय? कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह; मग निगेटिव्ह
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली अडकत असून आता महामंडळावरील कर्ज ६ हजार कोटींच्या घरात पोहोचले आहे. गेले दोन महिने कर्मचाऱ्यांना वेतनही देण्यात आलेले नाही. शिवाय, निवृत्त कर्मचारीही निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. पण त्यांनाही अनेक खेटे घालून हाती काहीही लागलेले नाही.
महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे @msrtcofficial साक्री डेपोचे वाहक कमलाकर बेंडसे यांना आत्महत्या करावी लागली..
हि ३ री ST कर्मचार्याची आत्महत्या…आपल्या खात्यातील कर्मचारी आत्महत्या करतात मंत्री @advanilparab झोप येते कशी??
असल्या मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा pic.twitter.com/sa8HahswU1— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 1, 2021