गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. परंतु या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. बैठकीमध्ये झालेल्या वादावर सरकारकडून सोयीस्कररीत्या पडदा टाकण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा पुनर्विकास खासगी विकसाकांऐवजी म्हाडामार्फत करण्याची मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लावून धरली. त्यामुळेच ऐन बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाजले.
म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ येथे सुमारे ५० हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजीत संख्या ३७००व झोपड्यांची संख्या अंदाजे १६०० अशी एकत्रित ५३०० इतकी आहे. मोतीलाल नगर वसलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता, गाळ्यांची घनता १०६ गाळे प्रति हेक्टर आहे. ही घनता बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या विनियम ३० (बी) नुसार ४५० गाळे प्रति हेक्टरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना त्यांनी धारण केलेल्या गाळ्यांच्या क्षेत्रफळापेक्षा मुबलक मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध आहे, या सर्व गोष्टींवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी सुभाष देसाई यांनी खासगी विकासकांना ही जागा देण्यात येऊ नये असे म्हटल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगला. हा पुनर्विकास प्रकल्प कंन्स्ट्रक्शन ऍण्ड डेव्हलपमेंट एजन्सीची नेमणूक करून करावयाचा असल्याने या प्रकल्पास विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्याचा निर्णय झाला.
हे ही वाचा:
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
‘पीएचडी, पदवी न घेताच तालिबानी नेते मोठे आहेत!’
बायकोच्या त्रासामुळे त्याचे २० किलो वजन घटले!
आता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट
उच्च न्यायालयाच्या २०१३ रोजीच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार आहे. तथापि, म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्यपरिस्थितीत शक्य नसल्याने एजन्सीची नियुक्ती करुन अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे. त्याकरिता काही अटींसह म्हाडातर्फे कच्ची पूर्व तयारी म्हणून करण्याकरिता पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आली.