स्थापनेपासून ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्या मांडीवर बसून शिवसेनेने सत्ता जवळ केली. तेव्हा पासून सामनाच्या ‘कार्यकारीं’ची दोरीवरची कसरत सुरू आहे. त्यांच्या अग्रलेखांचा सूर जरा जास्तच बदसूर झाला आहे.
सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान, पूजा चव्हाण, कोरोनाच्या काळातील प्रचंड भ्रष्टाचार आणि हा भ्रष्टाचार गौण वाटेल अशी ‘कार्यक्षमता’, अनेक मुद्यांवर घेतलेले यू-टर्न आणि सध्या गाजत असलेले एपीआय सचिन वाझे यांचे प्रकरण अशा अनेक मुद्यांमुळे शिवसेनेचे तोंड काळे झाले आहे. परंतु तरीही मुखपत्रातून पाठ थोपटून घेणे हे शास्त्र असते. शिवसेना नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत या शास्त्रातले पारंगत आचार्य आहेत. नेता म्हणून राहुल गांधींच्या नेतृत्वाचे कौतूक आणि सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेच्या कारभाराची प्रशंसा ही आजमितीला सगळ्यात खडतर कर्म आहेत. संजय राऊत आलटून पालटून ही कसरत रोज ज्या निष्ठेने करतायत त्याला तोड नाही.
सांगली, जळगाव महापालिका भाजपाच्या हातून निसटल्या. सत्ता गेल्यावर असे इकडचे तिकडेच व्हायचेच, पण ‘सामनाकारां’नी याचे वर्णन ‘करेक्ट कार्यक्रम’ असे केलेले आहे.
‘सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात, याचा अनुभव भाजपा घेत आहे’, असे कार्यकारी या अग्रलेखात म्हणतात.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात
प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे
आम्ही चार पावलं पुढे जाऊन सांगतो, मुख्यमंत्री पदाच्या टीच भर खुर्चीसाठी जिथे लोक वाडवडीलांनी शिरोधार्य धरलेला हिंदुत्वाचा विचार सोडतात, तिथे कुंपणावरच्या या कावळ्यांना दोष का आणि कसा द्यायचा?
जळगावात ‘करेक्ट कार्यक्रम’ करताना शिवसेनेने मन मोठे करून हैदराबादेतल्या रझाकारांचा वारसा सांगणा-या एमआयएमला हृदयाशी धरले. शिवसेनेने सत्तेसाठी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले असले तरी असदुद्दीन ओवेसी नामक आधुनिक मोहमद अली जिना मात्र आपल्या कट्टरवादी विचारधारेवर कायम आहे. जळगावात शिवसेनेशी चुंबाचुंबी करणा-या तीन नगरसेवकांना ओवेसीने एका झटक्यात पक्षातून हाकलले. कुंपणावरच्या कावळ्यांच्या गळ्यात गळे घालणा-या शिवसेनेपेक्षा कडवा ओवेसी जास्त प्रामाणिक निघाला.
काश्मीरमध्ये भाजपाने मेहेबूबा मुफ्तीशी युती केली यावरून शिवसेनेने भाजपा नेतृत्वावर अनेकदा तोंडसुख घेतले. परंतु मेहबूबाशी युती करून भाजपाने राम मंदीर, समान नागरी कायदा आणि कलम ३७० रद्द करण्याची भूमिका सोडली नाही. किंबहुना कलम ३७० रद्द करण्यासाठी, कश्मीरचे अंतरंग समजून घेण्यासाठी भाजपाने मेहबुबाच्या पक्षाला जवळ केले होते. शत्रूला जवळ करून कोथळा काढण्याचे प्रसंग महाराष्ट्राच्या भगव्या इतिहासाला नवे नाही. परंतु शिवसेनेला या इतिहासाचे विस्मरण झाले आहे.
कारण हा इतिहास लक्षात ठेऊन ‘राम मंदीर बांधून कोरोना जाणार आहे काय?’ असे प्रश्न विचारणा-या ‘जाणत्या काकां’च्या पक्षाशी, काँग्रेसशी सोयरीक करणे शिवसेनेला शक्य होणार नाही. त्यामुळेच राम वर्गणीची टवाळी, अजान स्पर्धा, उर्दू कॅलेंडर, टीपू जयंतीचे आय़ोजन अशी नवी सत्तासुलभ वाट शिवसेनेने स्वीकारली आहे.
विचार सोडून मिळालेला विजय क्षणभंगूर असतो. राम मंदीर आंदोलनात चार राज्यांवर पाणी सोडून भाजपाने आपली वैचारीक निष्ठा सिद्ध केली.
इटालियन काँग्रेसच्या वळचणीला जाऊन शिवसेनेने आपली सत्तानिष्ठा सिद्ध केली. परंतु ही सत्ता शिवसेनेला फळताना दिसत नाही. रोज बुडत्या शिवसेनेचा पाय खोलात जातो आहे. काँग्रेस आणि काकांनी सत्तेवर आल्यापासून शिवसेनेच्या करेक्शनचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर सोनिया काँग्रेस आणि काकांची ‘बिनपाण्या’ने केली. आता हे दोन्ही पक्ष शिवसेनेचे पोतेरे करून त्याचा सूड उगवत असल्याचे चित्र महाराष्ट्र पाहातो आहे. पूजा चव्हाण आणि वाझे प्रकरणात हे प्रकर्षाने दिसले.
विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जेव्हा वाझे प्रकरणात शिवसेनेची हजामत करत होते तेव्हा महाविकास आघाडीतले दोन्ही पक्ष बाजूला राहून मजा बघत होते. ही धुमश्चक्री इतकी जबरदस्त होती की चर्चे दरम्यान उद्धवजींना त्यांच्या चेंबरमधून सभागृहात येण्याचे धाडस झाले नाही. हा ‘स्थानिक विषय’ असल्याचे सांगून काकांनी हे प्रकरण झटकून टाकले. शिवसेनेच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही.
भाजपाचे उट्टे फेडण्याच्या नादात शिवसेनेने आपले नाक कापून घेतले आहे.
जळगावमध्ये, सांगलीमध्ये जे झाले तो जर करेक्ट कार्यक्रम असेल तर असे काही कार्यक्रम २०२२ च्या फेब्रुवारीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात मुंबई, ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी झालेल्या खेळखंडोबाचे चोख करेक्शन होण्याची शक्यता आहे. कुंपणावरचे कावळे सत्तांतर घडवण्याची क्षमता ठेवत असतील, पण असंतोषाने पेटलेली जनता क्रांती घडवते. राज्यात निवडणुकांची सेमी फायनल होणार आहे. फार दूर जाण्याची गरज नाही, आठ-दहा महिनेही शिल्लक नाही. न जाणो राज्यात कदाचित त्यापूर्वीही एखादा करेक्ट कार्यक्रम झालेला असेल.
न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय