शिवसेना कुणाची, १६ अपात्र आमदारांचे काय होणार यासंदर्भातील सुनावणी आज १४ फेब्रुवारीला होत असून त्यातून नेमके काय हाती लागते याकडे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी आज होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या सुनावणीला प्रारंभ होणार असून सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ यावर आपले मत मांडणार आहे.
या घटनापीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडून स्वतःचा मार्ग निवडल्यापासून हा संघर्ष सुरू आहे. त्यात आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून आपलीच शिवसेना ही खरी शिवसेना असा दावा करण्यात आला आहे. त्याचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयातून अपेक्षित आहे. यात मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाबरोबरच शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातील सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. पण सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने आपला निर्णय देऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तिकडे शिंदे गटाने मात्र आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
WPL : भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधनाला सर्वाधिक मानधन
ज्युलीने तुर्कीत ढिगाऱ्याखाली ६ वर्षांच्या बेरिनला पाहिले, रोमिओने खात्री केली आणि…
अजित पवार करतायत काय? किर्तन कि तमाशा?
लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ
अंधेरी, मुंबई येथे झालेल्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही गटांना स्वतंत्र नावेही देण्यात आली. त्यात उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले. शिवाय चिन्ह म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल तर बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले होते. याचा वाद आता निवडणूक आयोगात सुरू आहे.