आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्रात भाजपाला पर्याय म्हणून एकत्रित येऊन इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र, सध्या या आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनीही इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. मात्र, जागावाटपावर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असा इशारा फारूक अब्दुल्ला यांनी दिला आहे.
“लोकसभा निवडणुकांसाठी आता अगदीच कमी कालावधी आहे. जागावाटप लवकर झाले नाही तर इंडिया आघाडीसाठी हा धोका ठरू शकेल. इंडिया आघाडीत समावेश असलेल्या पक्षांमध्ये याबाबत लवकरच एकमत झाले नाही, तर काही पक्ष वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि असे झाले तर इंडिया आघाडीसाठी सर्वांत मोठा धोका तो ठरू शकतो. अद्यापही वेळ गेलेली नाही,” असा सूचक इशारा फारूक अब्दुल्ला यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. शिवाय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये ‘आप’ने निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!
DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!
ममता दीदीनंतर पंजाबचा सूर बदलला, पंजाबमधून आप- १३ जागांवर एकटाच लढणार!
सूर्या ठरला ‘टी- २० प्लेअर ऑफ दि इअर’
इंडिया आघाडीसाठी सर्वांत कठीण परिस्थिती ही पश्चिम बंगालमध्ये होती. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला असून, अधीर रंजन चौधरी यांनी या प्रस्तावावरून ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. यानंतर तृणमूल काँग्रेसने एकाला चलो रे चा नारा दिला आहे.