जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात शोक आणि संतापाचे वातावरण असताना माजी मुख्यमंत्री आणि जम्मू- काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. पाकिस्तानशी चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यांनी मानवतेची हत्या केलेली आहे, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सोमवार, २८ एप्रिल रोजी म्हटले की, १९४७ मध्ये काश्मिरींनी द्विराष्ट्र सिद्धांत फेकून दिला होता आणि हा प्रदेश पाकिस्तानसोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच ते पुढे म्हणाले की, ते पूर्वी पाकिस्तानशी चर्चा करावी या बाजूने होते, परंतु आता चर्चा शक्य नसून केंद्र सरकारकडून अशी कारवाई हवी आहे की असे हल्ले पुन्हा कधीही होणार नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की “मी नेहमीच पाकिस्तानशी संवाद साधण्यासाठी आग्रही असायचो, पण ज्यांनी आपले प्रियजन या हल्ल्यात गमावले आहेत त्यांना आपण कसे उत्तर देऊ? आपण न्याय देत आहोत का? आज, राष्ट्राला अशी कारवाई हवी आहे जेणेकरून अशा प्रकारचे हल्ले कधीही होऊ नयेत,” असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. द्विराष्ट्र सिद्धांताबद्दल बोलताना अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला म्हटले की, जम्मू- काश्मीरच्या लोकांनी १९४७ मध्ये हा सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाहीत.
पुढे ते म्हणाले की, “वाईट वाटते की शेजारी देशाला हे समजत नाही की त्यांनी मानवतेची हत्या केली आहे. जर त्यांना वाटत असेल की असे करूनही आपण पाकिस्तानसोबत जाऊ, तर आपण त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे. आपण १९४७ मध्ये त्यांच्यासोबत गेलो नव्हतो, तर आज आपण का जाऊ? त्यावेळी आपण द्विराष्ट्र सिद्धांत पाण्यात टाकला होता. आज आपण द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारण्यास तयार नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, आपण सर्व एक आहोत. आपण त्यांना योग्य उत्तर देऊ,” असा निर्धार अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा..
“पहलगाम सारख्या घटनेबद्दल माफी मागण्यासाठी शब्द नाहीत”
“वडेट्टीवारांच्या विधानाला मूर्खपणा म्हणावं की…” देवेंद्र फडणवीस संतापले
“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का?”
पाकिस्तानचे समर्थन अंगलट, तिघांना अटक
बुधवार, १६ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये एका परिषदेला संबोधित करताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल मुनीर म्हणाले होते की, पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या पाठीशी उभा राहील. काश्मीर आमच्या कंठाची नस आहे आणि आम्ही हे विसरणार नाही. तसेच त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचा पुनरुच्चार केला होता.