अरेरे! अखेर विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

अरेरे! अखेर विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुभाष जाधव होते. आत्महत्येआधी सुभाष जाधव यांनी पत्राच्या स्वरूपात त्यांना होत असलेल्या त्रासाची मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. परंतु दखल न घेतल्यामुळे सुभाष यांना मंत्रालयाच्या दारापर्यंत यावे लागले होते.

२० ऑगस्ट रोजी या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. या शेतकऱ्याच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या शेतकऱ्याने देखील मंत्रालयात अशीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील राहणारे होते. त्यांची जमीन व्यवहारामध्ये फसणूक झाली होती. आरोपींनी त्यांना आणि कुटुंबियांना मारहाण करुन अर्धनग्न करत जमीन बळकावली होती, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यातही धाव घेतली होती. पण पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे ते चिंतेत आले होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी थेट मंत्रालयात येण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा:

का झाला आहे वांद्रे वर्सोवा ‘स्लो’ लिंक?

फुटबॉलपटू म्हणतो, अफगाणिस्तान २० वर्षे मागे फेकला गेलाय

अरेरे! रक्षाबंधनाच्या दिवशी गर्भवती भगिनीचा खड्ड्यामुळे झाला अपघात

कुपोषणामुळे आणखी मृत्यू झाले तर लक्षात ठेवा!

सुभाष जाधव यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहित दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. २० ऑगस्टला ते मंत्रालय परिसरात आले. त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळाला नाही. पोलिसांनी त्यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटवरच सोबत आणलेले कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तात्काळ जी.टी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version