महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. यामुळेच संतप्त झालेल्या सांगलीतील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ‘मुख्यमंत्री १५ ऑगस्ट पर्यंत भेटले नाहीत तर आपण मातोश्री समोर जाहीर आत्मदहन करू’ असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी या शेतकऱ्याने शपथ घेतली असून चार वर्ष ते अनवाणी फिरत होते. पण आज त्यांना मुख्यमंत्री साधी भेटही देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
विजय जाधव असे या सांगलीतल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील साखरा इथले रहिवासी आहेत. राज्यातील बंद पडलेल्या बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू व्हाव्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार यावे म्हणून विजय जाधव यांनी शपथ घेतली होती.
हे ही वाचा:
…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक
अनिल देशमुख यांची पुन्हा हुलकावणी
‘कोनशिलेवर मुख्यमंत्र्यांचे नाव, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का नाही?’
पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?
या गोष्टी पूर्णत्वास जाईपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ जाधव यांनी घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच २०१७ साली नाशिक येथील एका मेळाव्यात ही शपथ जाधव यांनी घेतली होती. त्यावेळी आपले सरकार आल्यावर तुमच्या सर्व मागण्या मान्य करू असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले होते असे जाधव सांगतात.
पण आता सरकार आल्यापासून मुख्यमंत्र्यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे असे जाधव यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांना आता आपल्याला भेटायला मागत नाहीत असे जाधव म्हणतात. ‘गेल्या महिन्यात मी मुंबईला निघालो होतो पण सातार्यात मला पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही संविधानिक मार्गाने शेतकऱ्यांसाठी न्याय मागतोय तर मुख्यमंत्री आम्हाला भेटतही नाहीत.’ असा हल्लाबोल जाधव यांनी केला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर आपण मातोश्री समोर जाहीर आत्मदहन करू असा इशाराही विजय जाधव यांनी यावेळी दिला. ‘साम’ वाहिनीने या संबंधीचे वृत्त दिले आहे.