राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकीकडे शेतकरी आंदोलन सुरु असताना महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. अशोक भुयार असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांची संत्र्याची बाग होती. आत्महत्या करण्यापूर्वी भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहिले आहे.
बोराळ्यातील गणेश मंदिरात भुयार यांचा मृतदेह सापडला. त्यांना शेख गफूर आणि शेख आमिर हे दोन व्यापारी त्रास देत होते. स्थानिक पोलीस अधिकारी दीपक जाधवही त्यांना सामील असल्याचा आरोप आहे. भुयार यांनी मंत्रीमहोदयांना पत्र लिहून त्यांच्यावरच्या अन्यायाची करुण कहाणी मांडली आहे. शेख अमीन आणि शेख गफूर या दोघांनी भुयार यांच्याकडून माल खरेदी केला पण त्याचा मोबदला मात्र दिला नाही. पण त्यांच्याकडून जबरदस्ती पोचपावती मात्र सही करून घेतली. भुयार यांनी त्यांच्या हक्काचे पैसे मागितले असता त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. स्थानिक पोलिसांनीही भुयार यांची कोणतीही मदत केली नाही. शेवटी या अन्यायाला कंटाळून भयार यांनी विषप्राशन केले.
आपल्या लहान भावाच्या दुर्दैवी अंताचा जबर धक्का संजय भुयार यांना बसला. भावाच्या अंत्यविधीतून परतताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचेही निधन झाले. गावातल्या या दुःखद पण संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांचा जमाव पोलीस स्थानकावर येऊन धडकला आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली. शेवटी पोलीस प्रशासनाला या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेणे भाग पडले.