महाराष्ट्रात सध्या अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाशी संबंधित अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे हा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत आहे. या प्रकरणांचा तपास करताना सचिन वाझेशी संबंधित रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मंगळवारी सचिन वाझे ह्याच्याशी संबंधित एक बनावट आधार कार्ड राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. या सोबतच एका पंचतारांकित हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज आणि वाझे डायरीही त्यांनी ताब्यात घेतली आहे.
निलंबित एपीआय सचिन वाझे याचे बनावट आधार कार्ड मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला सापडले. या आधार कार्डचा वापर करून वाझे याने पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याचे तपशील समोर येत आहेत. वाझे याच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे खोटे नाव आहे. तर १५ जून १९७२ अशी खोटी जन्मतारीख टाकण्यात आली आहे. या बनावट आधार कार्ड वापरून वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा:
संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
बंद शाळांसाठी पोषण आहाराचे कंत्राट; महानगरपालिकेचा अजब कारभार
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने ट्रायडेंट हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजची कसून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत वाझे असेलेले फुटेज एनआयएच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये वाझेच्या हातात पाच मोठ्या बॅगा दिसत आहेत. या बॅगांमध्ये नेमके काय आहे याचे तपशील अजूनही समजू शकलेले नाहीत. या सोबतच फुटेजमध्ये एक महिला दिसत आहे. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याचे एक मशीन आहे. ही महिला नेमकी कोण आणि तिचा वाझेशी काय संबंध हे अजूनही समोर आलेले नाही.
या फुटेजसोबतच एनआयएला आपल्या तपासात वाझे याची डायरीही सापडली आहे. वाझे ह्याच्या कार्यालयाची झडती घेताना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती ही डायरी लागली आहे. वाझे याच्या डायरीत कोणाला भेटायचे, कधी भेटायचे याचे तपशील नमूद करण्यात आले आहेत. त्या सोबतच बार, पब्स, हुक्का पार्लर याचीही माहिती आहे. या डायरीमधून हफ्ता, खंडणी या संदर्भातील महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.