महाराष्ट्रातील गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले, घरे, दुकाने यांचे प्रचंड नुकसान झाले. आता या पीडितांना मदतीची,आधाराची खरी गरज आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे सुरू केल्यामुळे पीडितांना आधार मिळाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गावातील नागरिकांसाठी गावातील शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आज दुपारीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अन्न, धान्य आणि इतर सामुग्री कोकणात रवाना करण्यात आली आहे.
मदतीची सामुग्री पाठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेही पश्चिम महाराष्ट्रात गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं.
आंबेघर दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईकही याच शाळेत आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे नुकसान मोठं आहे. सर्वांचं पुनर्वसन होणे गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. नव्याने घर बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. त्यांना त्यांची पसंती पाहून जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती कायमस्वरूपी मदत करावी लागेल.”
हे ही वाचा:
१० खासदाराचं निलंबन होणार? कारण काय?
रिझर्व्ह बँकेची आता ‘या’ बँकवर मोठी कारवाई
लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला
येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे
रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास १५ लोक ढिगाऱ्याखाली दबले. २३ जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.