फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (३१ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या भेटीची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. परंतु महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात असताना दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मुंबईत आज एमएमआरडीए महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या विकास कामांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या २ए आणि ७ या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं नाव होतं, मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नावच नव्हतं. त्यामुळे भाजनपे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

हे ही वाचा:

सीबीएसई, आयसीएसई परीक्षा रद्द?

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते

‘टार्झन’चा अपघाती मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट?

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Exit mobile version