नवाब मलिक महायुतीत नको!

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिले पत्र; विरोधकांची हवाच काढली

नवाब मलिक महायुतीत नको!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणावरून राज्यात गुरुवारी जे रान उठविण्यात आले, त्याला वेगळीच कलाटणी दिली. राजकारणाला अनपेक्षित वळण देण्याची हातोटी असलेल्या फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक हे महायुतीत नकोत अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळात आलेल्या नवाब मलिकांवरून सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांची कोंडी झाली.

 

फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माजी मंत्री व विधानसभा सदस्य नवाब मलिक हे विधिमंडळातील कामकाजात सहभागी झाले होते. त्यांना तो अधिकार आहे शिवाय, आमचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व नाही. पण त्यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.

 

सत्ता येते जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते वैद्यकीय आधारावर जामीन घेऊन बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीत घेणे हे य़ोग्य ठरणार नाही.

 

आपल्या पक्षात कुणाला घ्यायचे, कुणाला नाही हा आपला अधिकार आहे आणि तो आम्हाला मान्य आहे पण महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचार प्रत्येक घटक पक्षाला करावा लागतो. त्यामुळे आमचा याला विरोध आहे. त्यांचा देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनाची नोंद घ्याल ही आशा.

हे ही वाचा:

नो वन किल्ड दिशा…

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा

मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!

देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रामुळे दिवसभर बाह्या सरसावून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांची मात्र कोंडी झाली. सकाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक हे विधिमंडळात दिसले. ते मागील बाकावर बसले होते. मात्र अजित पवार यांच्या गटाचे आमदार बसले होते तिथेच ते बसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. तुम्ही ज्यांना देशद्रोही म्हणालात त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसू शकता, असा आरोप केला जाऊ लागला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात उत्तर देताना हेच नवाब मलिक अटकेत असताना तुम्ही त्यांचे मंत्रिपद कायम ठेवले होते, मग तुम्हाला आता टीका करण्याचा काय अधिकाल असा सवाल विचारला होता. मात्र तरीही नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेतले जाणार का, त्यांना सामावून घेतले तर त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे काय असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. पण संध्याकाळी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकली.

 

Exit mobile version