‘मध्यावधी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सरकार धाराशाही होईल’ असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मध्यावधी निवडणुकांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. पण या तिन्ही पक्षांमध्ये आपसात प्रचंड कुरबुरी आहेत. दर दिवशी काही ना काही कारणाने या पक्षांमधले मतभेद राज्यातील जनतेसमोर येत असतात. याचे ताजे उदाहरण थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनच पाहायला मिळाले.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा
उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय
नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांचा दृष्टीने महत्त्वाचे विधान केले. “आघाडी किंवा युती होणार का? याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा.” असे उद्धव ठाकरे या बैठकी दरम्यान म्हणाले. यावरूनच आता महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
याच अनुषंगाने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. “उद्धवजींनी नेमके काय सांगितले हे मला माहीत नाही. पण मी इतकेच सांगू इच्छितो की मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचार हे सरकार करणार नाही.” असे फडणवीस म्हणाले. “सरकारला माहीत आहे की लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि जर निवडणूक झालीच तर हे सरकार धाराशाही होईल.” असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.