गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने ४०पैकी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस या गोव्यात भाजपाविरोधातील पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेस तर गोव्यातील जनतेला आपली पार्टी वाटत नाही तर आप हा पक्ष सकाळ संध्याकाळ खोटे बोलत असतो, असे म्हणत फडणवीस यांनी सांगितले की, या तिन्ही पक्षांचा संघर्ष भाजपासोबतच आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, भाजपाशी संघर्ष करणाऱ्या पक्षांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, काँग्रेसने २००७ ते २०१२ या कालावधीत मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग केला. मोठे घोटाळे त्यांनी केले. गोव्याची प्रतिष्ठाच धुळीस मिळाली. केवळ लुटीचे राजकारण करता यावे म्हणून काँग्रेसला गोवा हवे आहे. आज तर काँग्रेसचे अनेक नेते या पक्षाला सोडून गेले आहेत. काँग्रेसची विश्वासार्हताच संपुष्टात आली आहे.
फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवरही प्रहार केला. तृणमूलने ज्या पद्धतीचे राजकारण केले ते गोव्याने नाकारले आहे. गोवा हे एक मार्केट आहे आणि त्यातील नेते हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशा प्रकारचा विचार डोक्यात ठेवून तृणमूल काम करत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतले. त्यांची भूमिका हिंदूविरोधी आहे.
हे ही वाचा:
‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू
‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’
गोवा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रीकरांना दिले पर्याय
आम आदमी पार्टी अर्थात आप सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटे बोलत असते. दिल्लीतील परिस्थिती लोकांनी पाहिली आहे. लोकांना सबसिडी मिळत नाही, पाणीपुरवठ्याची समस्या आहे.हर घर नल ही पंतप्रधान मोदींचीच योजना त्यांनी अमलात आणली. त्यात केजरीवाल यांचे योगदान अजिबात नाही. मोहल्ला क्लिनिकचा गवगवा आपने केला पण मार्चमध्ये २२० मोहल्ला क्लिनिक बंद होती. कोरोना काळात या क्लिनिकचा फायदाच झाला नाही, असेही फडणवीस म्हणाले.