उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कुणाल कामराने केलेल्या वादग्रस्त कवितेनंतर त्याची चर्चा विधिमंडळ अधिवेशनात झाली. त्यानंतर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हीच कविता वाचून दाखवत पुन्हा एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याचा समाचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य अथवा कविता झाली. त्या संदर्भात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल इतकी चर्चा केली. सभागृहाने त्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरिता ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता पुन्हा वाचतात. त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही इथे बसलेल्या २८८ लोकांची काय औकातच नाही, हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न माझा नाही. ठाकरे गटाच्या त्या नेत्या कोणी मोठ्याही नाहीत, त्यांना शिक्षा करावी, अशी माझी अपेक्षाही नाही. पण, कुठेतरी या सभागृहाचा काय सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे. अध्यक्ष महोदय मी आपल्यावर सोडतो. आपण आमचे कस्टोडियन आहात, असे सांगून सभागृहाच्या अवमानाचा विषय मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला.
हे ही वाचा:
कर्जतचे फार्म हाऊस, ड्रग्ज, मुलांचे लैंगिक शोषण मेंदू गरगरवणारे आरोप…
काँग्रेसने आपला अजेंडा आणि झेंडा मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला
भारतात दुध उत्पादनात १० वर्षांत ६३.६ टक्के वाढ
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांची चमक
कुणाल कामराने ही कविता वाचून दाखवत एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केल्यावर कामराचा हा शो जिथे झाला तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कामराविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. तरीही कामराने पुन्हा एक कविता करत डिवचण्याचा प्रयत्न केला.
याबाबत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर टीका करत सभागृहात चित्रा वाघ कशा बोलतात ते कसे चालते असा प्रश्न विचारला.
ज्या सभागृहात एसएम जोशी, कॉ. डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, यांच्यासारख्या लोकांची भाषणे ऐकायला सभागृह तुडुंब भरायचं, त्या सभागृहात नीतेश राणे, चित्रा वाघ, संजय शिरसाट यासारख्या लोकांनी त्याचं पावित्र्य हरवून टाकलंय, याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही, असे अंधारे म्हणाल्या.