‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

विरोधी पक्षनेता म्हणून मी सुखी आहे, याचा विरोधकांना त्रास होत असावा. त्यामुळे शरद पवार यांना नेमकी माझ्याबद्दल कसली वेदना आहे, हे माहीत नाही. त्या वेदनेमुळेच त्यांना माझ्याविरोधात बोलावे लागले. नेमके काय दुखते आहे, ते पवारच सांगू शकतात, अशा शब्दांत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पवारांबाबत वक्तव्य केले. सध्या फडणवीस हे गोव्यात आहेत. अमित शहा हे गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच गोव्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस गोव्यात गेले आहेत. तेव्हाच त्यांनी विविध प्रश्नांवर आपली मते व्यक्त केली.

अजूनही मी मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे विधान फडणवीस यांनी केले होते, त्यावर पवारांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, मी लोकांना म्हणालो होतो की, तुम्ही गेल्या दोन वर्षांत जाणीव होऊन दिली नाही की मी मुख्यमंत्री नाही. जनतेने मला मान दिला. पदाला न्याय देता येतो, हे मी सिद्ध केलं. आनंद आहे की, विरोधी पक्षनेता म्हणूनही सुखी आहे. पण यामुळे अनेकांना जळजळ होते.

देशमुखांनी आधी राजीनामा दिलाच नव्हता

फडणवीस यांना प्रश्न विचारला की, लखीमपूर प्रकरणात केंद्रीय मंत्र्याचा मुलगा अडकला आहे, त्यासाठी मंत्र्याने राजीनामा द्यायला हवा. अनिल देशमुखांनीही असा राजीनामा दिला होता अशी मागणी केली जात आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रारंभी राजीनामा दिलाच नव्हता. तेव्हा पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची आवश्यकता नाही, असेच म्हटले होते. पण उच्च न्यायालयामुळे अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल झाला, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामात ठाकरे सरकारने सातत्याने अडचणीच आणल्या. मी मुख्यमंत्री असताना या कामांना एक गती प्राप्त झाली होती, ती कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. पण या सरकारने त्यात अडथळे आणले, असेही फडणवीस म्हणाले.

 

हे ही वाचा:

सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना मिझोराममध्ये दिले इनाम! कशासाठी ते वाचा…

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

‘…यालाच म्हणतात सत्तेचा माज!’

जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

 

राज्य सरकारने घोषित केलेल्या पॅकेजबद्दल काय वाटते, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, याआधी सरकारने ११ हजार कोटी दिले होते. पण त्यातील २-४ हजार कोटीच लोकांपर्यंत पोहोचले. हे पॅकेज मात्र नेमके काय आहे ते कळत नाही. कागदावर आहेत पॅकेज. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. घोषणा करायची पण काहीही करायचे नाही. विम्याचे १७०० कोटी भरलेले नाहीत. ते भरले तर केंद्रही तेवढेच देईल. पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हे सरकार तयार नाही.

Exit mobile version