भाजपाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. झेड प्लस संरक्षण असलेल्या व्यक्तीला जर पोलिस संरक्षण देऊ शकत नसतील तर कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे हे लक्षण आहे. मुंबई पोलिसांची अब्रू या सगळ्या प्रकारानंतर गेली आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्रश्न एवढाच आहे किरीट सोमय्या झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत. पोलिस स्टेशनला जाण्यापूर्वी त्यांनी पोलिसांना कळवले होते. भेट झाल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितले की १०० लोकांचा जमाव बाहेर आहे तो आपल्यावर हल्ला करू शकेल. हल्ला होणार असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांना म्हटले की, तुम्ही आधी क्लिअरन्स द्या. पण इतके सांगूनही हे झाले. पोलिसांनीच दगडफेक करायला परवानगी दिली. म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणात गुंडागर्दी सुरू आहे.
फडणवीस म्हणाले की, शरम वाटली पाहिजे पोलिसांना झेट प्लस असलेल्या व्यक्तीला संरक्षण देता येऊ शकत नसेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे. मुंबई पोलिसांची अब्रू घालवली आहे. देशातील सर्वोत्तम फोर्स दबावाखाली सरकारच्या नोकरासारखे वागत आहे. लोकशाही पायाखाल तुडवली जात आहे. सगळे सेक्शन जामिनपात्र आहेत आणि एका महिलेला जामिनपात्र कलम लावलेले असताना रात्री कोठडीत ठेवता येत नसताना कायदा तुडवून त्यांना ठेवण्यात आले आहे. एकूणच हा प्रकार गंभीर आहे. मी स्वतः यासंदर्भात सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत गृहमंत्री, गृहसचिव यांना पत्र लिहिणार असून या पोलिसांवर कारवाईची मागणी करणार आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे पोलिस वागत आहेत. त्यांच्या संरक्षणात हल्ले होत असतील तर खपवून घेणार नाही. आम्ही इशारा देतो की ते आम्हाला घाबरवू शकत नाही आम्हाला. आम्ही कायदा पाळतो म्हणजे हल्ला कराल असे होत नाही. जशास तेस उत्तरही देऊ. तात्काळ हे बंद करा लढाई आम्हीही करू.
हे ही वाचा:
‘मुंबईच्या डोक्यावरून भ्रष्टाचाराची सत्ता आम्ही उतरवणार’
मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?
‘१८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांची मतदार नोंदणी महाविद्यालयातच व्हावी’
शिवसैनिक सोडून राणा दाम्पत्यालाच अटक
फडणवीसांनी सांगितले की, एका महिलेला इतके हे घाबरले की हजारो लोक जमा करावे लागले. पोलिसांची मदत घ्यावी लागली. हनुमान चालिसेला रोखण्यासाठी हे काम यांनी केले आहे. जे यांचे घोटाळे बाहेर काढतील, त्यांना जीवे मारण्याची प्रवृत्ती यांनी सुरू केली. आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. इट से इट बजा देंगे.