देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विधिमंडळाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचे निलंबन करा, अशी मागणी विधिमंडळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांवर शरसंधान करत हा आमचा एक सदस्य निलंबित करण्यासाठी केलेला डाव आहे. असा पायंडा पडला तर भविष्यात येणारे सरकार कुठल्याही विरोधकाला शिल्लक ठेवणार नाही.
फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करणार नाही. पण आम्ही लढणारी माणसं आहोत, रडणारी नाही. त्या गोष्टीचा फायदा घेऊन सदस्याला निलंबित करण्याचा प्रयत्न असेल तर हे योग्य नाही. कारण सांगतो, आमचे १२ आमदार निलंबित केले तेव्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. प्रत्येकवेळी न्यायालयाचा अधीक्षेप आणावा असे मात्र आम्हाला वाटत नाही. इथे संविधान पाळले जात नाही. मनमानीप्रमाणे आमदारांना एक वर्ष निलंबित करायचे हे बरोबर नाही.
फडणवीस यांनी सांगितले की, ज्यावेळी नितेश राणे यांनी सदर वक्तव्य केले तेव्हा मी स्वतः भूमिका घेतली की नितेश राणे बोलले ते चुकीचे आहे. ती हिंमत आमच्यात आहे. अध्यक्ष महोदय, याठिकाणी डाव लक्षात येतो. एक सदस्य निलंबित करायचा आहे. एक वर्ष निलंबित केले १२ सदस्य लोकसभेत एका सेशनपुरते केले. अजून एक निलंबित करण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही कितीही कारवाई केली तरी आम्ही लढू. हे सगळे ठरवून चालले आहे.
हे ही वाचा:
नितेश राणेंचे निलंबन करण्याची मागणी
सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा
बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?
विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान
आवश्यकता असेल तर सदस्याला याठिकाणी जाब विचारू, पण बाहेर घडलेल्या घटनांवर जर सुरू झाले आणि असा पायंडा पाडलात तर लक्षात ठेवा येणारे सरकार कुठल्या विरोधकाला शिल्लक ठेवणार नाही. लोकशाहीची हत्या होईल. माझी विनंती आहे सभागृहाचे कामकाज नियमितपणे सुरू व्हायला हवे.
फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना निलंबित करा असे आपल्याला वाटत नाही, असे सभागृहात सांगितले.