मोदी सरकारच्या काळात ८८% नी वाढली इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात

मोदी सरकारच्या काळात ८८% नी वाढली इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्यातीत कमालीची वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात ८८ टक्क्यांनी वाढली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे.

२०१३-१४ सालच्या ६६ हजार लाख अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीवरून २०२१-२२ साली ही निर्यात १,२४,००० लाख अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. या निर्यातीत मोबाईल फोन्स, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर (लॅपटॉप्स, टॅब्लेट्स), टीव्ही व इतर ग्राहकोपयोगी वस्तू, औद्योगिक वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, आणि वाहन उद्योगात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा मोठा सहभाग आहे.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण २०१९ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिस्टीम संरचना आणि उत्पादन (ESDM) या क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनवणे हे उद्दिष्ट असून त्यासाठी लागणारे घटक विकसित करणे आणि या उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे हे काम सुरु आहे. यात मोठ्या उत्पादकांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLI), तसेच इलेक्ट्रॉनिक घटकांच्या व सेमीकंडक्टर्स उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना (SPECS) , सुधारित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर योजना (EMC 2. 0) ही माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादनासाठी असलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना, या चार योजनांद्वारे इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला पाठबळ देणे आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था तयार करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

निर्यातीत वाढ होण्यासाठी सरकार अनेक सक्रिय पावले उचलत आहे. विशेषतः कोविड काळामध्ये निर्यातीतील अडचणी, मर्यादा, आणि अडथळे दूर करण्यासाठी सरकारने विशेष देखरेख विभागाची स्थापना केली आहे. निर्यातदारांना परवाने मिळवण्यासाठी मदत करणारा व तक्रार निवारण करणारा एक माहिती तंत्रज्ञान आधारित मंच स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

Exit mobile version