भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींसह देशभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते.

मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला होता. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका वद्रा या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांच्या जाण्याने भारताने एक मोठा अर्थतज्ज्ञ गमावला आहे, अशी भावना व्यक्त केली.

उद्या २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक २७ नोव्हेंबरला सकाळी होणार आहे. दरम्यान, देशात सात दिवस दुखवटा पाळला जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून आपला आदर्श, गुरू हरपला आहे,असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ भजनावरून भाजपाचा संताप, गायिकेला मागावी लागली माफी!

शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंगच केला असता!

पाकिस्तानने पोसलेले १५ हजार तालिबान्यांची पाकिस्तानवरच कूच

इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्याला अभिनेत्री पवित्रा पुनियाने सुनावले

मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब येथे झाला होता. ते देशाचे १४ वे पंतप्रधान होते.
मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रातले उच्च पदवीधर आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकित विद्यापीठांमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले होते.

मनमोहन सिंह १९६९-७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे १९८२ ते १९८५ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर १९८५-८७ या काळात भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच १९९० ते १९९१ या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर १९९१ मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

Exit mobile version