‘महाराष्ट्र राज्य हे पवार कुटुंबियांच्या विकासासाठी आहे काय?’

‘महाराष्ट्र राज्य हे पवार कुटुंबियांच्या विकासासाठी आहे काय?’

माजी आमदार माणिकराव जाधव यांचे रोखठोक विधान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या घरांवर आयकर खात्याने छापेमारी सुरू केली आहे. ज्यांनी ही तक्रार केली ते माजी आमदार व कामगार नेते माणिकराव जाधव यांनी घणाघाती आरोप करत महाराष्ट्र राज्य पवार कुटुंबियांच्या विकासासाठी आहे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

‘टीव्ही ९’ ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने पवार कुटुंबियांच्या नावे करावेत, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नावे करावेत, त्यांच्या आमदार खासदारांच्या नावे करावेत ही नवी मोहीम शरद पवारांनी सुरू केली. धनंजय गाडगीळांनी उद्योगपतींच्या खासगी कारखान्यांचे सरकारीकरण केले. पण शरद पवारांनी तर उलटा नियम लावला. त्यांनी शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने उद्योगपतींच्या नावे केले. कोल्हापूरचा दत्त असोले पुरले हा सहकारी कारखाना दालमियाला दिला. सांगलीतला शिरोळमधील नीळाईदेवी दालमियाला दिला. हा पुष्पगंधेश्वर गोएंकाना दिला. शेतकऱ्यांचे कारखाने पवार घराण्याच्या नावे करायचे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे, त्यांच्या उपजीविकेचे साधन काढून घ्यायचे. हे लक्षात आल्यावर त्याची रीतसर तक्रार आम्ही १७ सप्टेंबर २०२१ ला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुबंई कार्यालयाकडे केली.

जाधव यांनी असाही थेट आरोप केला की, आयकर खात्यामार्फत जे छापे सुरू आहेत, त्यामुळे अजित पवार रडताहेत. माझ्या कंपनीवर, कारखान्यावर छापे घातले जात आहेत, असे ते म्हणत आहेत. पण कुठून आल्या तुमच्या कंपन्या अजित पवार? तुम्ही या कंपन्या बोगस स्थापन करून महाराष्ट्राला फसवत नाह का? शेतकऱ्यांचे कारखाने खासगी करून त्यांची फसवणूक केली आहे. हे कारखाने विकत घेण्यासाठी पैसे आले कुठून? याविषयी विचारले तर राग येण्याचे कारण काय? लोकसभा, विधानसभेसाठी तुम्ही पैसा आणता कुठून, शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी विकून पैसा जमा केलाय, हाच पैसा नातेवाईकांकडे गेलाय. बहिणीच्या घरावर छापा पडला तर तुम्हाला वाईट वाटले. आज हजारो भगिनी-बांधव उघड्यावर पडलेत. त्या हजारो बांधवांचा विचार तुम्ही करत नाही. तुम्हाला बहीण, काका, मुलाची काळजी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे हित कुणी बघायचे? महाराष्ट्राचे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे की पवारांच्या विकासासाठी आहे, असा सवाल आता जनता विचारणार आहे.

जरंडेश्वरचा कारखाना आपला म्हणणारा एकही महाभाग पुढे आलेला नाही

जाधव या मुलाखतीत म्हणतात की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मालकीचे ५५ कारखाने कवडीमोल किमतीने राज्य बँकेने, राज्य सरकारच्या संगनमताने विकले गेले आहेत. सरकारकडे तक्रार केली, मग प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने सांगितले की, सकृतदर्शनी हा गुन्हा झालेला आहे. तपासही झाला. महाराष्ट्रातील पोलिस शरद पवार, अजित पवार यांच्या इशाऱ्यावर चालतात. त्यांनी क्लिन चीट देण्याचा प्रयत्न केला. या कारखान्याच्या विक्रीची चौकशी सुरू होती. तत्कालिन मुख्यमंत्री, सहकार आयुक्त, सगळ्यांवर ठपका होता. सहकार खात्यामार्फत क्लिन चीट, पोलिसांकडून क्लिन चीट. ईडीने गुन्हा दाखल करून घेतला होता. प्रथम त्यांनी जरंडेश्वरची मालमत्ता जप्त केली. दोन महिने झाले पण हा कारखाना आमचा आहे, ही संपत्ती आमची आहे, असे म्हणणारा एकही महाभाग पुढे आलेला नाही. आज कारखाना परिसरातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की, हा कारखाना सुरू व्हावा.

 

हे ही वाचा:

आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे!

‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा राऊत यांनी उचलला विडा’

लखीमपूर प्रकरणी उद्या ‘सरकारी महाराष्ट्र बंद’

एक खमकी महिला कंडक्टर

 

जरंडेश्वरप्रमाणे नंदुरबारमधील पुष्पगंधेश्वर सहकारी साखर कारखाना, मराठवाड्यातला औरंगाबादमधील कन्नड साखर कारखाना ताब्यात घेतला. जालनातील जालना सह. कारखाना, नगर जिल्ह्यातील जगदंबा साखर कारखाना, पुणे जिल्ह्यातील दौंड सरकारी कारखाना होता तो खासगी केला गेला. त्या कारखान्याला दौंड प्रा. लि. केले गेले. तेव्हा त्याविरोधात तक्रार केली. पण हे एवढ्यावर थांबणार नाही. तुम्ही तयारी ठेवा आता अजितराव! तुम्ही एवढे मोठे पाप, गुन्हा केला की ५५ कारखान्यांचे खासगीकरण केले. ४५ कारखाने १५-२० वर्षे बंद आहेत आणि रोज एक कारखाना गिळत आहात. तुमची जागा आता बाहेर राहणार नाही, महाराष्ट्र सुरक्षित नाही. त्यामुळे तुमची जागा बाहेर नव्हे तुरुंगात राहण्याची आहे. म्हणूनच रडायची नाटकं, भावनात्मक व्हायचे सोडा सत्य बाहेर येऊ द्या. हे राज्य आपल्यासाठी नव्हे घराण्यासाठी चालवले जात आहे.

Exit mobile version