माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिले पत्र
पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत माजी पोलिस महासंचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठे पाऊल उचलत आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. हे प्रकरण आधीच तापलेले आणि चर्चेत असून मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निशाण्यावर आहेत, अशा स्थितीत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे पत्र हे महत्त्वाचे आहे.
प्रशासकीय अधिकारी जरी निवृत्त झाले असले तरी त्यांनी त्यांच्या देशाप्रती असलेल्या जबादारीच्या आणि कर्तव्याच्या जाणीवेतून हे पत्र लिहिले आहे. देशातील विविध ठिकाणचे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे पत्र राष्ट्रपतींना लिहिले आहे. या पत्रात पंजाबचे माजी पोलीस महासंचालक पीसी डोगरा, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, त्रिपुराचे बीएल व्होरा यांच्यासह २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पत्रात तथाकथित आंदोलकांच्या संगनमताने पंजाब सरकारने नियोजित अशी सुरक्षेची चूक केली आहे, यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
देशातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले सर्व माजी पोलीस अधिकारी पंजाबमधील घडलेल्या या प्रकाराने थक्क झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या प्रस्तावित दौऱ्यात रास्ता रोको करून अशांतता निर्माण केली, ही सुरक्षेतील त्रुटी तर आहेच, शिवाय राज्य प्रशासन आणि आंदोलक यांनी संगनमत करून घडवण्यात आलेली पंतप्रधानांसाठी लाजीरवाणी आणि नुकसान पोहचू शकणारी निंदनीय घटना आहे.
हे ही वाचा:
मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर
पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद
सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित
या घटनेचे गांभीर्य तसेच त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम लक्षात घेता ही बाब तुमच्यापर्यंत (राष्ट्रपती) पोहोचवण्यास प्रवृत्त करत आहेत, असे पत्रात म्हटले आहे. पंतप्रधानांच्या ताफ्याला उड्डाणपुलावर मुद्दाम १५ ते २० मिनिटे थांबवणे हे पंजाबमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे लक्षण असून याचा लोकशाहीलाही धोका आहे, असे पत्रात म्हटले आहे.
बुधवार ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटींमुळे हा दौरा रद्द करण्यात आला. पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडविला आणि २० मिनिटे पंतप्रधानांना थांबावे लागले. नंतर त्यांचा ताफा मागे वळला आणि नियोजित ठिकाणचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असून यासंदर्भात फिरोजपूरचे एसएसपी निलंबित झाले आहेत तर या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागविला आहे.