मेट्रो मॅनचा भाजपा प्रवेश, ‘या’ माजी काँग्रेस मंत्र्याने ट्वीटरवरून केले स्वागत

मेट्रो मॅनचा भाजपा प्रवेश, ‘या’ माजी काँग्रेस मंत्र्याने ट्वीटरवरून केले स्वागत

मेट्रो मॅन ई.श्रीधरन हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. श्रीधरन यांनी स्वतः या गोष्टीची माहिती दिली आहे. मुळचे केरळचे असणारे श्रीधरन भाजपाच्या विजय यात्रे दरम्यान कमळ हाती घेणार आहेत. श्रीधरन यांच्या राजकीय प्रवेशावरून माजी मंत्री असलेल्या एका काँग्रेस नेत्याने त्यांचे स्वागत केले आहे.

वयाच्या ८८ वर्षी श्रीधरन यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीधरन यांच्या या निर्णयावर समाजातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने श्रीधरन यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी श्रीधरन यांच्या राजकीय प्रवेशाचे समर्थन केले आहे. देवरा यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

ई. श्रीधरन यांनी भाजपा प्रवेशापूर्वी केले मोठे वक्तव्य…

“ई श्रीधरन यांचे स्वागत करायला कोणालाही भाजपा समर्थक असण्याची गरज नाही. एक कसलेले प्रोफेशनल. देशांच्या काही यशस्वी अभियंता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक. ई.श्रीधरन हे संपूर्ण भारताचे आहेत. आपल्या राजकारणाला त्यांच्यासारख्या अनेकांची गरज आहे.” असे देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देवरा यांच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे.

केरळ राज्याच्या निवडणूका जवळ आलेल्या असताना ई. श्रीधरन यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीचा भाजपामध्ये प्रवेश हा खूप महत्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version