महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ब्रेकिंग न्यूजच्या अपेक्षेने पोहोचलेल्या सर्व पत्रकारांची घोर निराशा झाली. या पत्रकार परिषदेत दबक्या आवाजात बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा मोरांचाच आवाज अधिक होता.
दिल्ली येथील ६ जनपथ या शरद पवारांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दिल्लीत मोरांची संख्या जास्त आहे. दिल्लीतील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रशस्त घरांमधील बागांमध्ये या मोरांचा मुक्त वावर असतो. पवारांच्या पत्रकार परिषदेची वेळीही आसपास या मोरांचा वावर आढळून आला. पवारांच्या पत्रकार परिषदेतून अपेक्षित बातमी मिळत नसल्याने पत्रकारांचेही वारंवार लक्ष्य त्या मोरांवरच जात होते.
दिल्ली येथे पवारांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी काँग्रेसचे बंडखोर नेते पी सी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. चाको यांनी दहा मार्च रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.
पी सी चाको हे काँग्रेस पक्षाचे केरळमधील ज्येष्ठ नेते होते. केरळच्या थ्रिसूर मतदार संघातून ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून देखील आले होते. केरळमध्ये विधानसभा निवडणुका एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या असताना पीसी चाको यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पार्टीचा राजीनामा देणे हा काँग्रेससाठी धक्का मानला जात होता. चाको यांनी केरळमध्ये काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचा आरोप केला होता. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानांतर राष्ट्रवादी केरळ विधानसभेत खाते उघडणार का याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
पी सी चाको यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले संबंध ताणले जातात का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये आणि संयुक्त पुरोगामी आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. चाको यांच्या प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे ही वाचा:
मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार
कोणाच्या सांगण्यावरून सचिन वाझेने स्फोटकांनी भरलेली गाडी ॲंटिलियासमोर ठेवली
शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे पवारांनी सांगितले. सरकार चालवताना अडचणी येत असतात पण महाराष्ट्र सरकार चांगले काम करत आहे असे पवार म्हणाले. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदली संबंधी प्रश्न विचारला असताना याविषयी मुख्यमंत्री बोलतील असे शरद पवारांनी सांगितले.