काँग्रेसचे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता दक्षिणेतील आणखी एका नेत्याने भाजपाचे दरवाजे उघडून प्रवेश केला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी भाजपामध्ये दाखल होण्याचा निर्णय़ घेतला आहे. काही आठवड्यांपूर्वी किरणकुमार यांनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे एका ओळीत पत्र लिहून रामराम ठोकला होता.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हे पत्र त्यांनी पाठवले होते. भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात किरण कुमार यांनी अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपाचे नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या प्रवेशानंतर बोलताना किरण कुमार म्हणाले की, मी अशी कल्पनाही केली नव्हती की, मी काँग्रेस पक्ष कधी सोडेन. काँग्रेसच्या नेतृत्वावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, असे म्हणण्याचा प्रघात आहे की, माझा राजा बुद्धिमान आहे. स्वतः तो कधीही विचार करत नाही आणि कुणाला सल्लाही मानत नाही.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, किरण कुमार यांच्या कुटुंबातील अनेक लोक हे काँग्रेसचे सदस्य आहेत. पण किरण कुमार यांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. भ्रष्टाचाराविरोधात भाजपाची जी लढाई आहे, त्याला किरण कुमार यांच्या या निर्णयामुळे बळ मिळेल. आंध्र प्रदेशमध्ये भाजपाला यामुळे ताकद मिळेल. मी काही काळापूर्वी त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, मोदींमुळे मी प्रभावित झालो आहे. आज त्यांनी अखेर भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
पारीख समिती असे काय म्हणते की, घरगुती गॅसच्या किमती येतील खाली!
ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले
गच्चीवरील पाण्याच्या टाकीवरून कामगार कोसळला
२०१४मध्ये किरण कुमार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या तत्कालिन यूपीए सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी हे राजीनाम्याचे पाऊल उचलले होते. त्यांनी मग समऐक्य आंध्र नावाचा स्वतःचा पक्ष काढला. २०१४च्या निवडणुकीत त्यांनी काही उमेदवारही उभे केले. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. २०१८मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचे ठरविले होते.
आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा काँग्रेसला जबरदस्त फटका बसला होता. काँग्रेसचे अनेक नेते त्या निर्णयामुळे पक्षत्याग करून बाहेर पडले. शिवाय, लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातून काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.