मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ३० मे रोजी रात्री राज्याच्या जनतेशी संवाद साधला. पण यावरून मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका होऊ लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे ‘नव्या थापा, नव्या बाता’ असा घणाघात त्यांनी केला आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत भातखळकर यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

अतुल भातखळकर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की मुख्यमंत्र्यांचे आजचे फेसबुक लाईव्ह हे देखील नेहमीप्रमाणे निराशाजनक होते. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाच्या बाबत मुख्यमंत्री धडधडीत खोटे बोलले असा आरोप भातखळकर यांनी केला आहे. या संदर्भातील जीआर राज्य सरकारने २८ तारखेला काढल्याचे भातखळकर यांनी सांगितले आहे. त्या आधारेच भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी १२ कोटी लस खरेदी करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले पण ही थाप आता जनतेला पचणारी नाही. कारण आता हॉटेलांना लसी मिळायला लागल्या आहेत, रुग्णालयांना मिळतच आहेत तरीही सरकारला लसी येत नाहीत हे न पटणारे आहे.

हे ही वाचा:

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्राकडे बोट

सात वर्षे स्वच्छतेची… मोदी है तो मुमकिन है

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ

आधीच ‘उल्हास’; त्यात उशिरा आली जाग

बारावीच्या परीक्षेचा निर्णय करताना विचार केला पाहिजे, कारण बारावीनंतर विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे असते असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. त्यासाठी त्यांनी पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवले. पण यावरूनच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना भातखळकर यांनी दहावीच्या परीक्षांचा मुद्दा उचलून धरला आहे. दहावी नंतरही विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याविषयी सरकारने विचारपूर्वक निर्णय करावा असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन चालू ठेवला असला तरीही दुकाने उघडण्याची सवलत दिली जावी आणि राज्यातल्या जनतेला काही थातूरमातूर नाही, तर घसघशीत पॅकेज देण्यात यावे अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री मराठा आणि ओबीसी आरक्षणवरही बोलले असते तर बरे झाले असते असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

Exit mobile version