राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो

राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो

राज्याचा प्रत्येक मंत्री हा स्वतःला एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री समजू लागला आहे असा सणसणीत टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दैनिक लोकसत्ता आयोजित दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील राजकारण, ठाकरे सरकारने घातलेला आरक्षणाचा घोळ, भाजपाची राजकीय वाटचाल, सोशल मीडिया अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले

राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्री हा स्वतःला एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री समजू लागला आहे आणि हे जिल्ह्याच्या विकासासाठी नसून त्यांचा वैयक्तिक फायद्यासाठी आहे असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. महापालिकेची टेंडर, कॉन्ट्रॅक्ट ही आपल्या माणसाला मिळावी यासाठी सारा खटाटोप असतो असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उदाहरणादाखल नुकत्याच जळगाव महापालिकेत झालेल्या सत्तांतराकडे बोट दाखवले. जळगाव महापालिकेत सत्तांतरासाठी झालेल्या घोडेबाजारावर फडणवीसांनी निशाणा साधला. मी मुख्यमंत्री असताना जळगावमध्ये महापालिकेचे ३०० कोटीचे कर्ज फेडले, १०० कोटी निधी दिला. पण आता सत्ताधारी पक्षाने काय दिले जळगावला? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

तर ठाकरे सरकारने घोळ घालून केलेल्या आरक्षणाच्या गुंत्यावरही त्यांनी विस्तृत भाष्य केले. आरक्षणाच्या सगळ्या तांत्रिक बाजू त्यांनी उलगडून सांगितल्या. ठाकरे सरकारने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात कोर्टात बाजू मांडताना काय चुका केल्या आणि आपण वेळोवेळी सावध करूनही सरकारने हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.

हे ही वाचा:

‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’

राज्यात सध्या तीन सरकारं

कोरोना आजार नाही,अल्लाहची माफी मागून होईल सुटका! सपा खासदाराची मुक्ताफळे

मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात

समाज माध्यमांची विश्वासार्हता संपत चालली आहे
समाज माध्यमांची विश्वासार्हता ही संपत चालली आहे सुरुवातीला व्हॉट्सऍपवर आलेली बातमी ही खरीच आहे असे मानले जात होते पण आता तसे नाही. एक प्रकारचे संक्रमण आहे असे फडणवीस म्हणाले. यासाठी त्यांनी इंटरनेटचे उदाहरण दिले. २००१ च्या सुमारास एखादी माहिती इंटरनेटवरून आणली आहे म्हटल्यावर त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन फार वेगळा असायचा. पण आता तसे नाही. सोशल मीडियावर अनेक खोट्या आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. माध्यमांचे लोगो वापरून मॉर्फ फोटो बनवले जातात आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. या साऱ्या प्रकारांमुळेच आता सुशील मीडियाची विश्वासार्हता संपत चालली आहे असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपाच्या पराभवावर व्यक्त होताना मतदारांची नोंदणी करू न शकल्यामुळे भाजपाचा पराभव झाला असे मत फडणवीसांनी मांडले आहे. कोविड काळात आम्ही कार्यकर्त्यांना कोविड मदतकार्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे मतदारांची नोंदणी करणे कार्यकर्त्यांना शक्य झाले नाही. नंतर या निवडणुकांची मतदार नोंदणी सरकारी पातळीवरून व्हावी असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. या निवडणुकांचे समीकरण बघता ज्याचे रजिस्ट्रेशन अधिक तो निवडणूक जिंकतो. त्यामुळे सरकारी पक्षांना याचा लाभ झाला असे फडणवीस म्हणाले. तसेच या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही बेसावध होतो अशी कबुलीही फडणवीसांनी दिली. या निवडणूका पुढे ढकलल्या जातील असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. पण तसे झाले नाही. पण त्याचवेळी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक जागा भाजपाच्या निवडून आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच पुढच्या वेळी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपाच विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version