आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाने तेलंगणचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित केले आहे. कुमार यांनी रविवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ भेट दिला होता.
तेलंगणच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्याकडे होती. ते एका मतदारसंघातून उभेही होते. रविवारी सकाळी निकाल जाहीर होण्याआधीच तेलंगणचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार यांनी राज्य पोलिस दलातील नोडल अधिकारी संजय जैन यांच्यासोबत रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला. मात्र हे वर्तन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे सांगत भारतीय निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे ही वाचा:
पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार
परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक
तीन राज्यांत काँग्रेसचा चिखल, भाजपाचे कमळ फुलले !
एका वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ जाहीर केला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालकांना निलंबित करावे, अशी शिफारस तेलंगणच्या मुख्य सचिव सांथी कुमारी यांना केली होती. त्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवी गुप्ता यांना पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तेलंगणच्या मुख्य सचिव ए. संथी कुमारी यांनी तातडीने सरकारी आदेश काढून ‘रवी गुप्ता यांना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने पोलिस महासंचालक पद, तेलंगणच्या पोलिस दलाचे प्रमुख या पदाचा पूर्ण अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, असे नमूद केले आहे.