‘महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस

नैतिकता पालन समितीने शिफारस केल्याची माहिती

‘महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस

प्रश्नांसाठी लाच मागितल्याचा आरोपाखाली चौकशी सुरू असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी शिफारस संसदेच्या नैतिकता पालन समितीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, सरकारने मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यातील पैशांच्या व्यवहारांचाही तपास करावा, असाही सल्ला समितीने दिला आहे.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यात संसदेत प्रश्न विचारण्यावरून रोख रक्कम आणि महागड्या भेटींची देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला होता. दुबे यांनी यासाठी ऍड. जय अनंत देहाडराई यांच्या पत्राचाही उल्लेख केला होता. त्यात त्यांनी असा व्यवहार झाल्याप्रकरणी काही पुरावेही सादर केले होते. याच संदर्भात नैतिकता पालन समितीकडून मोईत्रा यांची चौकशी सुरू आहे. मात्र मोईत्रा यांनी सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी भाजप खासदार दुबे आणि देहाडराई यांना नोटीसही पाठवली आहे. हे आरोप तथ्यहीन आणि प्रतिमा मलीन करणारे असून हे आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही, असा दावा केला आहे.

असे असले तरी संसदेच्या नैतिकता पालन समितीने मोईत्रा आणि हिरानंदानी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराचा तपास करण्याची शिफारस केली आहे. नैतिकता पालन समितीने या संदर्भातील आपला अंतिम अहवाल तयार केला असून तो गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता सादर केला जाईल. त्यानंतर समितीचे भाजप आणि विरोधी पक्षांचे सदस्य त्यावर मतदान करतील.

हे ही वाचा:

…आणि फिजिओच्या सल्ल्यामुळे कोलमडलेला मॅक्सवेल पुन्हा उभा राहिला

अमेरिकेत चाकुने हल्ला झालेल्या भारतीय तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू

आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश

बागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांची हिंदू धर्मात घरवापसी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या अध्यक्षांनी महुआ मोईत्रा यांना २ नोव्हेंबरच्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नाचा विपर्यास केल्याबद्दल बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्या वर्तनाचा आचार समितीने निषेध केला आहे. समितीने दानिश अली यांच्या वर्तनावर गंभीर आक्षेप घेतला आहे. पॅनेलच्या बैठकीत सार्वजनिक भावना भडकावल्याचा आणि अध्यक्ष व इतर सदस्यांचा स्वाभिमान दुखावल्याचा आरोप समितीने त्यांच्यावर केला आहे.

Exit mobile version